Join us

सर्वसामान्यांना पुन्हा झटका! आता विमाही महागणार, युद्ध तसेच जागतिक परिस्थितीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 10:01 IST

आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसणार आहे.

नवी दिल्ली : आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसणार आहे. माेटार वाहनांसह विविध प्रकारचा विमा महागणार आहे. प्रीमियममध्ये सुमारे १० ते १५ टक्के वाढ हाेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमा रिन्युअलचे दर वाढले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात मालमत्ता, कर्ज, मोटार वाहन इत्यादी विम्यासाठी प्रीमियमचा दर किमान १० टक्क्यांनी वाढू शकतो. भारतातील कंपन्या अनपेक्षित देणी, मोठे नुकसान इत्यादींमुळे हाेणारा ताेटा कमी करण्यासाठी मोठ्या रकमेचा विमा घेतात. आग, समुद्री जाेखीम, अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक व्यत्यय कव्हर करण्याचा त्यांचा हेतू असतोे. मात्र, आता या कंपन्यांचाही विम्यापाेटी खर्च वाढणार आहे.

Airtel च्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ, मुंबईत 5G वापरणाऱ्यांची संख्या २० लाखांवर

जागतिक कंपन्यांनी विमा रिन्युअलच्या प्रीमिअममध्ये ४० ते ६० टक्के वाढ केली आहे. त्याचा भारतातही परिणाम होण्याची शक्यता आहे.

कशामुळे वाढले दर?

पाश्चिमात्य देशांमध्ये मध्यवर्ती बॅंकांनी या वर्षी जवळपास ५ टक्के व्याजदर वाढविले आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांचा खर्च वाढला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलामुळे अनिश्चितता प्रचंड वाढली आहे. क्लेम वाढले आहेत? त्यामुळे विमा कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. युक्रेन युद्धाचाही परिणाम आहे. युद्धामुळे विमा कंपन्यांना नुकसान झाले आहे.

थर्ड पार्टी विमादेखील महागण्याची शक्यता

पुनर्विम्याचा खर्च वाढल्यामुळे थर्ड पार्टी विमा १० ते १५ टक्के महाग हाेण्याची शक्यता आहे. माेटार वाहन कायद्यानुसार किमान थर्ड पार्टी विमा घेणे बंधनकारक आहे.

दुचाकी वाहनांच्या खरेदीवर ५ वर्षांचा आणि चार चाकी गाडी घेतल्यास ३ वर्षांचा विमा घेणे बंधनकारक आहे.

ग्राहक म्हणतात, आयुर्विमा परवडत नाही

प्रीमियममध्ये माेठी वाढ झाल्यामुळे आयुर्विमा घेणाऱ्या ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. हा खर्च परडवत नसल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी एका सर्वेक्षणातून दिली.

टॅग्स :व्यवसाय