Join us
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखरन यांची नियुक्ती करताना नोएल टाटांची नवी खेळी; तिसऱ्या कार्यकाळाला मंजुरी, पण घातली एक अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 11:09 IST

Tata Group : टाटा समूहातील नेतृत्वाशी संबंधित घडामोडींना आता वेग आला आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला मंजुरी दिली असली, तरी त्यांनी हा कार्यकाळ नेहमीच्या पाच वर्षांऐवजी केवळ दोन वर्षांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

Tata Group : देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह असलेल्या 'टाटा समूहा'मध्ये सध्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून मोठी खळबळ माजली आहे. टाटा सन्सचे विद्यमान चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला मंजुरी दिली आहे. पण, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी एक 'मोठा पेच' निर्माण केला आहे. चंद्रशेखरन यांना पाच वर्षांऐवजी केवळ दोन वर्षांचा कार्यकाळ देण्याचा प्रस्ताव नोएल टाटा यांनी मांडल्याने कॉर्पोरेट वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

काय आहे नोएल टाटांचा 'थ्री-लेयर' प्लॅन?नोएल टाटा यांचे मत आहे की, समूहाची सर्व सूत्रे एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रित नसावीत. त्यांनी सुचवलेल्या नव्या आराखड्यानुसार टाटा सन्समध्ये तीन स्तरांची नेतृत्व संरचना असेल.

  • नॉन-एग्जीक्यूटिव चेअरमन
  • सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर
  • डेप्युटी सीईओ

या बदलामुळे चेअरमनचे अधिकार विभागले जाऊन कंपनीत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व येईल, असा नोएल टाटांचा दावा आहे. चंद्रशेखरन यांना दिलेला दोन वर्षांचा वाढीव वेळ हा केवळ 'ब्रिज पिरीयड' म्हणून असेल, ज्या काळात समूहाचा नवा वारसदार शोधला जाईल.

गुंतवणुकीवरून नाराजीचा सूर?नोएल टाटा यांच्या या प्रस्तावामागे चंद्रशेखरन यांच्या काळात झालेल्या काही मोठ्या गुंतवणुकींची चिंता असल्याचे समजते.मोठी गुंतवणूक : एअर इंडिया, टाटा डिजिटल आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स (सेमीकंडक्टर) सारख्या क्षेत्रांत समूहाने सुमारे ११ बिलियन डॉलर्स (९० हजार कोटी रुपये) गुंतवले आहेत. चिंतेची बाब : हे नवे व्यवसाय सध्या मोठ्या प्रमाणावर 'कॅश बर्न' (नुकसान) करत आहेत. या कंपन्यांच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी स्पष्ट निकष नसल्याचे आणि टाटा सन्सकडून सातत्याने मिळणाऱ्या फंडिंगवर नोएल टाटांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बोर्डाच्या बैठकीत निर्णयाला स्थगिती२४ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या टाटा सन्सच्या बोर्ड बैठकीत चंद्रशेखरन यांच्या मुदतवाढीचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. स्वतः चंद्रशेखरन यांनीच हा निर्णय पुढे ढकलण्याचे सुचवले होते. दरम्यान, हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, नोएल टाटा या विषयावर ठाम असून, उत्तराधिकारी योजनेवर एकमत झाल्याशिवाय लांबचा कार्यकाळ देण्यास त्यांचा विरोध आहे.

अनुभव विरुद्ध नवे धोरणएन. चंद्रशेखरन १९८७ पासून टाटा समूहात आहेत. टीसीएसला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात त्यांच्यासारखा अनुभवी नेता गरजेचा असल्याचे काही संचालकांचे मत आहे. मात्र, नोएल टाटा यांची टीम भांडवल वाटप आणि कामगिरीवर कडक भूमिका घेत आहे. तसेच टाटा सन्सला पब्लिक मार्केटमध्ये लिस्ट करण्यालाही नोएल टाटांचा विरोध असल्याचे समजते.

थोडक्यात पार्श्वभूमीएन. चंद्रशेखरन: जूनमध्ये ६३ वर्षांचे होतील. २०१७ पासून टाटा सन्सचे चेअरमन.नोएल टाटा: टाटा ट्रस्टचे चेअरमन (टाटा सन्समध्ये ६५.९% हिस्सा). त्यांनी अलीकडेच नेव्हिल टाटा आणि भास्कर भट यांना ट्रस्टमध्ये सामील करून घेतले आहे.

वाचा - गुंतवणूकदारांनो सावधान! जगातील सर्वात मोठा 'मार्केट क्रॅश' जवळ? कियोसाकींनी सांगितले श्रीमंत होण्याचे सूत्र

टाटा समूहातील हा अंतर्गत कलह कोणत्या दिशेला जातो आणि आगामी काळात समूहाची कमान कोणाकडे सोपवली जाते, याकडे संपूर्ण उद्योग विश्वाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Noel Tata's move: Limited term for Chandrasekaran at Tata Sons.

Web Summary : Noel Tata proposes a shorter term for N. Chandrasekaran, advocating for a three-tier leadership structure at Tata Sons. Concerns over investments and the lack of clear performance metrics drive this change, aiming for greater transparency and a search for a successor.
टॅग्स :टाटानोएल टाटाव्यवसाय