Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं गाठला आजवरचा उच्चांक, शेजारी देशांत का स्वस्त?; सरकार म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 14:48 IST

Petrol Diesel Price Hike : हे दर विक्रमी स्तरावर आहेत हे म्हणणं चुकीचं ठरेल. तसंच पेट्रोल आणि डिझेलच्या दराची तुलना शेजारी राष्ट्रांमधील किंमतीशी करणंही अयोग्य असल्याचं पेट्रोलियम मंत्र्यांचं वक्तव्य

ठळक मुद्देहे दर विक्रमी स्तरावर आहेत हे म्हणणं चुकीचं ठरेल पेट्रोल आणि डिझेलच्या दराची तुलना शेजारी राष्ट्रांमधील किंमतीशी करणंही अयोग्य: धर्मेंद्र प्रधान

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलडिझेलच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. यामुळे सामान्य लोकांच्या खिशावरही मोठा ताण पडत आहे. सध्या देशात अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर ९८ रूपयांवर पोहोचले आहेत. तर अनेक शहरांमध्येही पेट्रोल डिझेलच्या दरानं उच्चांक गाठला आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर ८७ रुपयांवर तर मुंबईत पेट्रोलचे दर ९४ रूपयांवर पोहोचले आहे. या प्रकरणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत उत्तर दिलं. पेट्रोलियम प्रोडक्टच्या किंमती या आंतरराष्ट्रीय दरांवर अवलंबून आहेत. यासाठी हे दर विक्रमी स्तरावर आहेत हे म्हणणं चुकीचं ठरेल. तसंच पेट्रोल आणि डिझेलच्या दराची तुलना शेजारी राष्ट्रांमधील किंमतीशी करणंही चुकीचं असल्याचं ते म्हणाले. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी राज्य सभेत इंधनाच्या वाढत्या दरांवर उत्तर दिलं. यावेळी भारताच्या तुलनेत नेपाळ आणि श्रीलंकेत इंधनाचे दर कमी का असाही प्रश्न करण्यात आला. तसंच सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार का असाही प्रश्न धर्मेद्र प्रधान यांना विचारण्यात आला. यावेळी पेट्रोलियम मंत्र्यांनी या देशांची इंधनाच्या दराशी तुलना करणं चुकीचं असल्याचं म्हटलं. या देशांमध्ये कमी प्रमाणात लोकं त्याचा वापर करतात. केरोसिनच्या दरात भारत आणि य़ा देशांमध्ये मोठा फरक आहे. बांगलादेश आणि नेपाळसारख्या देशांमध्ये केरोसिनचे दर ५७ ते ५९ रूपये लिटर इतके आहे. परंतु भारतात केरोसिन ३२ रूपयांना मिळतं असंही ते म्हणाले. कराबाबत प्रधान काय म्हणाले?पेट्रोल डिझेलच्या दरांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे, परंतु कच्च्या तेलाच्या किंमती उच्चांकी स्तरावर नाहीत. भारतात पेट्रोलचे दर १०० रूपयांच्या जवळ पोहोचले आहेत. एक्ससाईज ड्युटी किती वेळा वाढवण्यात आली आहे? असा प्रश्नही त्यांना करण्यात आला. "आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ६१ डॉलर्स प्रति बॅरल इतक्या झाल्या आहेत. आपल्या देशात राज्य आणि केंद्र सरकार कर संकलनाबाबत सावधान आहे. प्रत्येकाला आपली वेलफेअर कमिटमेंट आणि विकास कामांना प्राधान्य द्यायचं आहे. केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क वाढवलं आहे आणि राज्यांनी वॅटदेखील वाढवला आहे. परंतु केंद्र सरकारनं किंमती कमीदेखील केल्या आहेत," असं प्रधान म्हणाले.३०० दिवसांमध्ये ६० दिवस दरवाढ"गेल्या ३०० दिवसांमध्ये ६० दिवस असे आहेत ज्यात इंधनाचे दर वाढले आहेत. तर ७ दिवस असे आहेत ज्यावेळी पेट्रोलच्या किंमती कमी झाल्या. तर डिझेलचे दर २१ दिवस कमी करण्यात आले. तर २५० दिवस असे होते ज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाही. पेट्रोल डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत हे सांगून कॅम्पेन करणं अयोग्य आहे. तसंच यावरील एक्ससाईज ड्युटी कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही," असं प्रधान यांनी नमूद केलं.

टॅग्स :पेट्रोलडिझेलखनिज तेलराज्यसभाबांगलादेशनेपाळश्रीलंका