Join us  

खडतर मार्गातून वाटचाल, तरीही निफ्टीचा उच्चांक

By प्रसाद गो.जोशी | Published: August 20, 2018 1:55 AM

रुपयाने मारलेली नीचांकी डुबकी, पावसाचा लहरीपणा, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाची भीती अशा विविध संकटांशी मुकाबला करतानाच विविध आस्थापनांचे आलेले चांगले निकाल, बाजारामध्ये झालेली खरेदी यामुळे सप्ताहाच्या अखेरीस बाजाराने पुन्हा उसळी घेतली आणि सलग चौथ्या सप्ताहात हिरवा रंग कायम ठेवला. दरम्यान निफ्टीने ११४७०.७५ अशी नवीन उच्चांकी बंद निर्देशांकाची धडक मारली.

रुपयाने मारलेली नीचांकी डुबकी, पावसाचा लहरीपणा, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाची भीती अशा विविध संकटांशी मुकाबला करतानाच विविध आस्थापनांचे आलेले चांगले निकाल, बाजारामध्ये झालेली खरेदी यामुळे सप्ताहाच्या अखेरीस बाजाराने पुन्हा उसळी घेतली आणि सलग चौथ्या सप्ताहात हिरवा रंग कायम ठेवला. दरम्यान निफ्टीने ११४७०.७५ अशी नवीन उच्चांकी बंद निर्देशांकाची धडक मारली.गत सप्ताहामध्ये बाजार अतिशय अस्थिर असलेला दिसून आला. बाजाराला एक दिवस स्वातंत्र्य दिनाची सुटी होती. त्यामुळे केवळ चारच दिवस व्यवहार झाले. त्यातही दोन दिवस निर्देशांकांनी डुबकी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक काहीसा खालच्या पातळीवर खुला झाला. त्यानंतर तो ३८००२२.३२ ते ३७५५९.२६ अंशांदरम्यान हेलकावत ३७९४७.८८ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ७८.६५ अंशांची वाढ झालेली दिसून आली.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ने ११४७०.७५ असा नवीन उच्चांकी बंदचा विक्रम नोंदविला. सप्ताहामध्ये या निर्देशांकात ४१.२५ अंशांची वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांकही अनुक्रमे १६३०६.४४ (९६.२६ अंशांची वाढ) आणि स्मॉलकॅप १६८६६.२१ (८२.०१ अंशांची वाढ) असे बंद झाले.सप्ताहामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाने नवीन नीचांकी पातळी गाठली असली तरी नंतर तो सुधारला. रुपयाच्या डुबकीमुळे भारताच्या चालू खात्यावरील तूट वाढणार असली तरी बाजाराने काही फारसे दडपण घेतलेले दिसत नाही. काही आस्थापनांचे आलेले चांगले निकाल आणि परकीय तसेच देशी वित्तसंस्थांनी केलेली चांगली खरेदी यामुळे बाजार सप्ताहाच्या अखेरीस तेजीमध्ये दिसून आला. रुपयाच्या मूल्यामध्ये घट झाली असली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत. महागाई कायम राहिल्याने रिझर्व्ह बॅँकेने व्याजदर वाढविले आहेत.बाजारात ९ आस्थापनांचे व्यवहार होणार निलंबितयेत्या १0 सप्टेंबरपासून ९ आस्थापनांच्या समभागांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार निलंबित करणार असल्याची घोषणा प्रमुख शेअर बाजार असलेल्या मुंबई आणि राष्टÑीय शेअर बाजाराने केली आहे. यामध्ये बॅँक घोटाळ्यातील संशयित मेहूल चोक्सीच्या गीतांजली जेम्सचा समावेश आहे.भांडवल बाजाराकडे दर तिमाहीला आस्थापनेच्या आर्थिक बाबींची माहिती देण्याची अट असते. काही आस्थापनांनी गेल्या दोन तिमाहींची माहिती बाजाराला दिलेली नाही. त्यामुळे येत्या १० सप्टेंबरपासून या ९ आस्थापनांच्या समभागांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार निलंबित केले जाणार असल्याचे मुंबई तसेच राष्टÑीय शेअर बाजाराने जाहीर केले आहे.गीतांजली जेम्स, अ‍ॅम्टेक आॅटो, इदून रेरोल, पॅनोरामिक युनिव्हर्सल, थंबी मॉडर्न स्पिनिंग मिल्स, इंडो पॅसिफिक प्रोजेक्ट, हरियाना फायनान्शियल कॉर्पाे.,नोबल पॉलिमर्स आणि समृद्धी रियालिटी या त्या आस्थापना आहेत.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी