Join us

नवे तंत्रज्ञान, नवे उद्योग; नव्या वर्षात भरपूर जॉब्स; नोकऱ्या ९ टक्के वाढणार, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:51 IST

अनुभवी कामगारांचीही चलती असेल. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नवे तंत्रज्ञान आणि त्यावर मोठ्या प्रमाणात सुरु होत असलेले उद्योग यामुळे नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे संकेत मिळत आहेत. जॉब्स अँड टॅलेंट प्लॅटफॉर्म फाऊंडइटच्या एका अहवालातून ही बाब पुढे आली आहे. आगामी वर्षात नोकऱ्या देण्याचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढू शकते, असे यात म्हटले आहे. 

२०२४ मध्ये नव्या नियु्क्तींचे प्रमाण १० टक्के इतके होते. नोव्हेंबर हे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले आहे. यातून २०२५ मध्येही नव्या नियुक्तीचे प्रमाण वाढण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत, असे यात म्हटले आहे. आगामी वर्षात अनेक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये प्रशिक्षित कामगारांना वरिष्ठ पदांसाठी मोठी मागणी असणार आहे. अनुभवी कामगारांचीही चलती असेल. 

कोणत्या क्षेत्रात अधिक संधी?

पुढच्या वर्षात आयटी, रिटेल, टेलिकॉम, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात नव्या नियुक्तींचे प्रमाण लक्षणीय असेल, असेही म्हटले आहे. 

एज कम्प्युटिंग, क्वांटम ॲप्लिकेशन, सायबर सिक्युरिटी, इनोव्हेटिव्ह मॅनिफॅक्चरिंगसह हेल्थकेअरमध्येही मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असणार आहे.

रिटेल मिडिया नेटवर्क, एआय संचालित ई-कॉमर्स, एचआर, डिजिटल सर्व्हिसेस या क्षेत्राचे स्वरुप आगामी काळात झपाट्याने बदलून जाणार आहे. 

डिजिटलीकरणाने मिळाली गती

२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये नोकऱ्या मिळणयाचे प्रमाण सर्व क्षेत्रांमध्ये चांगले होते. nकन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स २० टक्क्यांनी वाढले. तर रिअल इस्टेटमध्ये नोकऱ्या २१ टक्के वाढल्या आहेत.

वाढते औद्योगिकरण, यंत्रणांचे वेगाने होणारे डिजिटलीकरण आणि वेगाने होणारे शहरीकरण यामुळे नोकऱ्यांच्या निर्मितीला आणखी गती मिळाली आहे.

कोईमतूरमध्ये मागील वर्षात २७ टक्के नोकऱ्या मिळाल्या. हेच प्रमाण जयपूरमध्ये २२ टक्के होते.

 

टॅग्स :नोकरी