Join us

New India Bank Scam: तिजोरीच्या क्षमतेपेक्षा अधिक पटीनं दाखवला पैसा; १२२ कोटींच्या घोटाळ्यात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:58 IST

काही दिवसांपूर्वी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा समोर आला होता. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती. परंतु आता १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी एक मोठं अपडेट समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा समोर आला होता. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती. परंतु आता १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी एक मोठं अपडेट समोर आली आहे.  बँकेच्या प्रभादेवी शाखेत एकावेळी १० कोटी रुपये ठेवण्याची क्षमता होती, मात्र हँडबुकमध्ये नोंदवलेल्या नोंदीनुसार आरबीआयच्या तपासणीच्या दिवशी तिजोरीत १२२.०२८ कोटी रुपये होते. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) हा खुलासा केला आहे. बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची ईओडब्ल्यू चौकशी करत आहे. या प्रकरणी आतापर्यंत बँकेच्या दोन माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेच्या तपासणी पथकानं ११ फेब्रुवारी रोजी प्रभादेवी येथील बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या शाखेला भेट दिली. येथे त्यांना तिजोरीतून १२२ कोटी रुपयांची रोकड गायब असल्याचं आढळून आलं. कॉर्पोरेट कार्यालयाच्या शाखेच्या ताळेबंदात प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील बँकेच्या तिजोरीत १३३.४१ कोटी रुपये, तर प्रभादेवी शाखेच्या ताळेबंदात त्या दिवशी १२२.०२८ कोटी रुपयांची नोंद करण्यात आली. तपासादरम्यान कॉर्पोरेट कार्यालयातील कॅश चेस्टची क्षमता केवळ १० कोटी रुपये असल्याचे ईओडब्ल्यूच्या निदर्शनास आलं, तर प्रत्यक्षात तिजोरीत ६० लाख रुपये सापडले.

प्रश्न का विचारला नाही?

आरबीआयनं केलेल्या तपासणीच्या दिवशी गोरेगाव शाखेच्या तिजोरीत १०.५३ कोटी रुपयांची रोकड आढळून आली. गोरेगाव शाखेच्या तिजोरीतही १० कोटी रुपये साठवण्याची क्षमता होती. बँकेच्या आर्थिक नोंदी तपासणाऱ्या लेखापरीक्षकांनी गहाळ झालेल्या रोख रकमेबाबत बँकेला प्रश्न का विचारला नाही आणि कारवाईसाठी पाठपुरावा का केला नाही, याचा तपास आता ईओडब्ल्यू करत आहे.

काय आहे प्रकरण?

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक, खातेप्रमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. पुढील तपासासाठी हे प्रकरण शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलं होतं. बँकेचे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षि घोष यांनी १४ फेब्रुवारी रोजी मध्य मुंबईतील दादर पोलीस ठाणे गाठून निधीचा अपहार झाल्याची तक्रार दाखल केली होती. बँकेचे महाव्यवस्थापक आणि खातेप्रमुख हितेश मेहता यांनी अन्य साथीदारांसोबत कट रचला, असं फिर्यादीत म्हटलंय. आरोपींनी बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव कार्यालयातील तिजोरीत ठेवलेल्या पैशांपैकी १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचं म्हटलं होतं.

टॅग्स :बँक