Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलच्या दराने गाठली नवी उंची; पेट्रोलमध्ये पाच तर डिझेलमध्ये १३ पैशांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 03:14 IST

देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये पेट्रोलचे दर लिटरला ८७.१९ रुपये असे झाले आहेत.

नवी दिल्ली : देशामधील इंधनांच्या किमतीमधील वाढ अखंडितपणे सुरूच आहे. सोमवारीही इंधनाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे डिझेलच्या दराने नवीन उच्चांक गाठला आहे. राजधानीमध्ये आता डिझेलचे दर लिटरला रु. ८०.५३ असे झाले आहेत.

सोमवारी सलग २२व्या दिवशी इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. पेट्रोल लिटरला पाच पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर १३ पैशांनी महागले आहे. या दरवाढीमुळे येथील पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे रुपये ८०.४३ आणि ८०.५३ प्रतिलिटर झालेआहेत.

गेल्या २२ दिवसांमध्ये एक दिवस पेट्रोलच्या दरामध्ये कोणताही बदल केला गेला नाही. अन्य सर्व दिवशी दर वाढले आहेत. या कालावधीत पेट्रोलमध्ये लिटरला ९.१७ रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलचे दर तर दररोज वाढले असून, त्यामध्ये गेल्या तीन सप्ताहांमध्ये ११.१४ रुपये प्रतिलिटर अशी वाढ झाली आहे.मुंबईमध्ये पेट्रोल ८७ रुपयांच्यावरदेशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये पेट्रोलचे दर लिटरला ८७.१९ रुपये असे झाले आहेत. डिझेलच्या दरांमध्येही सोमवारी झालेल्या वाढीनंतर हे दर आता ७८.८३ रुपये प्रतिलिटर असे झाले आहेत. प्रत्येक राज्य सरकारांकडून इंधनावर विक्रीकर तसेच मूल्याधारित कर (व्हॅट) आकारला जात असल्याने प्रत्येक राज्यांमधील इंधनाचे दर वेगवेगळे असतात.

टॅग्स :पेट्रोल