Join us

देशव्यापी लाॅकडाऊनने घटला इंधनाचा वापर, दोन दशकानंतर घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 01:00 IST

fuel : पेट्रोलिअम मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन १९९८-९९ नंतर प्रथमच देशातील इंधनाचा खप कमी झाला आहे.

नवी दिल्ली : देशामधील पेट्रोल आणि डिझेलचा खप दरवर्षी वाढता असतो; मात्र दोन दशकांनंतर प्रथमच मागील आर्थिक वर्षामध्ये इंधनाच्या खपामध्ये ९.१ टक्क्यांनी प्रचंड घट नोंदविली गेली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेले सुमारे तीन महिन्यांचे लॉकडाऊन आणि वाहतूक व उत्पादन बंद असल्याचा हा परिणाम आहे. वर्षभरामध्ये पेट्रोलचा खप ६.७ टक्के, तर डिझेलचा खप १२ टक्क्यांनी घटला आहे. पेट्रोलिअम मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन १९९८-९९ नंतर प्रथमच देशातील इंधनाचा खप कमी झाला आहे. सन २०२०-२१मध्ये देशभरात १९ कोटी ४६ लाख टन इंधनाची विक्री झाली आहे. त्याआधीच्या वर्षामध्ये ही विक्री २१.४१ कोटी टनांची होती. याचाच अर्थ या वर्षामध्ये इंधन विक्रीमध्ये झालेली घट ही ९.१ टक्के अशी प्रचंड आहे. सन २०२०-२१मध्ये पेट्रोलची विक्री २.७९ टन एवढी झाली, तर डिझेलची विक्री ७.२७ कोटी टनांची झाली आहे. मागील वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या काळामध्ये कारखाने तसेच वाहतूक बंद असल्यामुळे इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झालेला दिसून आला होता. त्यानंतर जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी केले तरी वाहतूक मात्र बराच काळ बंद असल्याने वाहनांना लागणारे इंधन वापरलेच जात नव्हते. त्याचा फटका पेट्रोलिअम उद्योगाला बसला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याचा खूपच मोठा फटका बसला असून, विमानाच्या इंधनाचा खप ५३.६ टक्क्यांनी खाली आला आहे. वर्षभरामध्ये ३७ लाख टन विमानाचे इंधन विकले गेले आहे. याशिवाय नाफ्थ्याची विक्री १.४२ कोटी टनांची झाली आहे. मागील वर्षाच्या आकड्यांच्या साधारण बरोबरीत हे आकडे आहेत. गेल्या काही वर्षांपासून देेशामधील रस्तेबांधणी जोरात सुरू असल्यामुळे डांबराचा खप वाढलेला दिसून येत आहे. वर्षभरात ७१.१ लाख टन डांबराची विक्री झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना तसेच सुवर्ण चतुष्कोन योजनेंतर्गत रस्ते बांधणी होत आहे.

एलपीजीचा वापर वाढलागतवर्षामध्ये केवळ घरगुती वापराच्या गॅसचा वापर वाढलेला दिसून आला आहे. या वर्षामध्ये २.७६ कोटी टन गॅसचे वितरण करण्यात आले. आधीच्या वर्षापेक्षा (२.६३ कोटी टन) हे प्रमाण ४.७ टक्क्यांनी जास्त आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत अनेक गरीब कुटुंबाना गॅसचे वितरण करण्यात आले असून, त्याचाही हातभार घरगुती गॅसचा खप वाढण्यासाठी झाला असावा.

टॅग्स :व्यवसायपेट्रोलडिझेल