Join us  

दराअभावी नाशिकच्या कांद्याची आवक घटली; होलसेल मार्केटमध्ये ३२ रुपये किलो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 2:17 AM

सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये २८ ते ३२ रुपये किलो दराने कांदा विकला जात असून किरकोळ मार्र्केटमध्ये कांदा ४० ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे.

नवी मुंबई : मुंबईमध्ये कांद्याचे दर घसरल्यामुळे नाशिकवरून होणारी आवक जवळपास थांबली आहे. पुण्यावरून येणाऱ्या कांद्यावर मुंबईकरांची गरज भागविली जात आहे. सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये २८ ते ३२ रुपये किलो दराने कांदा विकला जात असून किरकोळ मार्र्केटमध्ये कांदा ४० ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे.मुंबई व नवी मुंबईसाठी प्रतिदिन एक हजार ते १६०० टन कांद्याची आवश्यकता असते; परंतु मागील एक महिन्यापासून आवश्यकतेपेक्षा कमी आवक होऊ लागली आहे. शनिवारी फक्त ७४२ टन कांद्याची आवक झाली आहे. नाशिक, पुणे व काही प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईत कांद्याची आवक होत असते. काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबईपेक्षा स्थानिक बाजारपेठेमध्ये भाव जास्त असल्याने शेतकरीही मुंबईत माल पाठवत नाहीत. व्यापारीही पुणे जिल्ह्यातून कांदा मागविण्यास जास्त पसंती देत असून, ९० टक्के आवक पुणे परिसरातून होत आहे. नाशिकच्या स्थानिक बाजारपेठेमधील भाव नियंत्रणात येईपर्यंत तेथून फारशी आवक होणार नाही, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.मुंबईमध्ये सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यामध्ये कांदा ३७ ते ४७ रुपये किलो दराने विकला जात होता. शासनाने निर्यातबंदी केल्यानंतर बाजारभाव घसरण्यास सुरुवात झाली आहे. दसºयानंतर बाजारभाव पुन्हा वाढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :कांदा