Join us  

ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 1:58 PM

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पाहा त्यांचा यशाच्या शिखरावरून जमिनीवर येण्यापर्यंतचा प्रवास.

जेट एअरवेजचे (Jet Airways) संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. न्यायमूर्ती एन. जे. जामदार यांच्या खंडपीठानं गोयल यांना एक लाख रुपयांचे बॉण्ड भरावे लागतील, असं सांगितलं. कनिष्ठ न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुंबई सोडता येणार नाही. गोयल यांची दोन महिन्यांसाठी अंतरिम जामिनावर सुटका करण्यात यावी, असं खंडपीठानं म्हटलं आहे. तसंच त्यांना सर्व अटींचं पालन करावं लागणार आहे. 

एकेकाळी नरेश गोयल भारतातील १६ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. ते इंडस्ट्रीतलं मोठं नाव होतं. जेट एअरवेजची स्थापना नरेश गोयल यांनी १९९३ मध्ये केली. टेल विंड्स कॉर्पोरेशनच्या पाठिंब्यानं ऑईल ऑफ मॅनमधून सुरुवातीच्या भांडवलासह त्यांनी जेट एअरवेजचं कामकाज सुरू केलं. जेट एअरवेजच्या २००५ च्या आयपीओनंतर फोर्ब्सनं नरेश गोयल यांना १.९ अब्ज डॉलरसंपत्तीसह भारतातील १६ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान दिलं होतं. 

बालपणी अनेक अडचणी 

नरेश गोयल यांचा जन्म १९४९ मध्ये पंजाबमधील संगरूर येथे एका ज्वेलरी ट्रेडरच्या घरी झाला. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचं कुटुंब आर्थिक संकटातून गेलं. यामध्ये त्यांच्या घराचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर ते आईच्या काकांकडे राहू लागले. गोयल यांनी पटियाला येथील बिक्रम कॉलेज ऑफ कॉमर्समधून कॉमर्सची पदवी घेतली. 

गोयल यांनी १९६७ मध्ये त्यांचे मामा सेठचरण दास राम लाल यांच्या ट्रॅव्हल एजन्सी ईस्ट वेस्ट एजन्सीजमध्ये कॅशियर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचा पगार महिन्याला ३०० रुपये होता. कॉमर्स शाखेतून पदवी घेतल्यानंतर गोयल लेबनानी इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या जीएसएसोबत ट्रॅव्हल व्यवसायात रुजू झाले. १९६७ ते १९७४ या काळात त्यांनी अनेक परदेशी विमान कंपन्यांच्या सहकार्यानं ट्रॅव्हल व्यवसायाचं व्यापक प्रशिक्षण घेतलं. या काळात त्यांनी व्यवसायाच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात परदेश प्रवास केला. 

जामिनासोबत अनेक अटी 

मुंबई उच्च न्यायालयानं गोयल यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. गोयल (७५) यांनी वैद्यकीय आणि मानवतेच्या कारणास्तव अंतरिम जामीन मागितला होता. ते आणि त्यांची पत्नी अनिता गोयल दोघेही कर्करोगानं ग्रस्त आहेत. गोयल यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयानं फेब्रुवारीमध्ये फेटाळला होता. मात्र, त्यांना त्यांना हव्या असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची परवानगी देण्यात आली. 

कोर्टात काय युक्तिवाद चालला? 

त्यानंतर गोयल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पात्रतेच्या आधारावर जामीन मागितला. वैद्यकीय कारणास्तव अंतरिम दिलासा देण्याची विनंती त्यांनी केली. गोयल यांचे वकील हरीश साळवे यांनी मानवतेच्या कारणास्तव या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली. 

मात्र, ईडीची बाजू मांडणारे हितेन वेणेगावकर यांनी जामीन अर्जाला विरोध केला. गोयल यांना अधिक दिवस रुग्णालयात ठेवण्यास एजन्सीला हरकत नसल्याचं त्यांनी म्हटलं. वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला की, न्यायालय गोयल यांच्या रुग्णालयात दाखल होण्यास आणखी चार आठवड्यांची मुदतवाढ देऊ शकते. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवीन वैद्यकीय अहवाल मागवला जाऊ शकतो. त्यावर साळवे यांनी गोयल यांची तब्येत बिघडली असून त्यांची मानसिक स्थितीही चांगली नसल्याचा युक्तिवाद केला. 

गोयल कोणत्या गुन्ह्यात तुरुंगात? 

कॅनरा बँकेकडून जेट एअरवेजला मिळालेल्या ५३८.६२ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीने गोयल यांना सप्टेंबर २०२३ मध्ये अटक केली होती. आरोपपत्र दाखल केल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये ईडीने त्यांच्या पत्नीला अटक केली होती. अनिता गोयल यांचे वय आणि तब्येतीचा विचार करून त्याच दिवशी विशेष न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला होता.

टॅग्स :जेट एअरवेजअंमलबजावणी संचालनालयउच्च न्यायालय