Join us

बाजारात वाढणार माझा पैसा; १० वर्षांत गुंतवणूकदार १० पट, वर्षभरात नवे २.३ कोटी बाजाराशी जोडले गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:37 IST

स्टॉक एक्स्चेंजकडून मिळालेल्या  माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत बाजारातील थेट आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीद्वारे (म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून) किरकोळ गुंतवणूकदार १० पट वाढले आहेत.

नवी दिल्ली : केलेली बचत विविध पर्यायांमध्ये गुंतवून वाढवण्याचे अनेक पर्याय असतानाही मागील काही वर्षांत लोक यासाठी शेअर बाजाराकडे वळत असल्याचे दिसून आले आहे. 

स्टॉक एक्स्चेंजकडून मिळालेल्या  माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत बाजारातील थेट आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीद्वारे (म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून) किरकोळ गुंतवणूकदार १० पट वाढले आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये बाजारातील एकूण गुंतवणूकदारांची संख्या १० कोटींच्या घरात पोहचली. एक कोटी गुंतवणूकदार केवळ पुढच्या ४ महिन्यांत जोडले गेले आहेत. त्यामुळे डिसेंबर-२०२४ पर्यंत गुंतवणूकदारांची एकूण संख्या १०.९ कोटींच्या घरात पोहोचली आहे. यावरून बाजारावर लोकांचा विश्वास वाढल्याचे दिसते. 

गुंतवणूकदारांकडे १७.६% हिस्सा- किरकोळ गुंतवणूकदारांकडे लिस्टेड कंपन्यांच्या बाजार भांडवलाचा १७.६ टक्के इतका हिस्सा आहे. २०१४ मध्ये याचे प्रमाण १०.९ टक्के इतके होते.

- किरकोळ गुंतवणूकदारांनी ९.६ टक्के थेट गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक ८ टक्के इतकी आहे. 

वर्षभरात २.३ कोटी गुंतवणूकदार बाजाराशी जोडले गेले. ही एका वर्षातील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. भारत हा जगातील चौथा मोठा बाजार आहे, ज्याचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. 

महिलांचा वाढता सहभाग- गुंतवणूकदारांचे सरासरी वय २०२० मध्ये ४१.१ वर्षे इतके होते, जे २०२४ मध्ये कमी होऊन ३५.८ वर्षे झाले आहे.

- एकूण गुंतवणूकदारांपैकी महिलांचा वाटा २४ टक्के इतका आहे. हा वाटा वर्षभरापूर्वी २३% इतका होता.

एक तृतीयांश तीन राज्यांमध्येसंपूर्ण भारतात फक्त ३० पिन कोड क्षेत्र वगळता, ९९.८४ टक्के पिन कोड क्षेत्रांमध्ये इक्विटी गुंतवणूकदार आढळून आले आहेत. संपूर्ण देशभरात असलेल्या एकूण गुंतवणूकदारांपैकी एक तृतीयांश केवळ महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये आहेत.

उत्तर प्रदेशने नवीन नोंदणीत महाराष्ट्राला (२९.७ टक्के ) मागे टाकून आघाडीचे राज्य म्हणून स्थान मिळवले आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान या राज्यांमध्ये अनुक्रमे ३६.२ टक्के, ४०.५ टक्के आणि ३०.३ टक्के नवे गुंतवणूकदार वाढले आहेत.

 

टॅग्स :व्यवसायगुंतवणूक