Join us  

मुंबई शेअर बाजार घरंगळला; सेन्सेक्स १०६९ अंशांनी खाली, पॅकेजचा परिणाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:18 AM

बाजारात वित्तीयसंस्था तसेच वाहन उद्योगाच्या समभागांना विक्रीचा मोठा फटका बसला. यामध्ये एचडीएफसी, मारूती सुझुकी, अ‍ॅक्सिस बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट हे समभाग सुमारे १० टक्क्यांनी घटले.

मुंबई : सरकारने दिलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा शेअर बाजारावर फारसा प्रभाव पडला नसून, पॅकेज जाहीर झाल्यापासून बाजार खाली येत आहे. सोमवारी सेन्सेक्स १००० अंशांहून अधिक खाली आला. त्याने गेल्या दीड महिन्यातील नीच्चांकी पातळी गाठली.जगभरातील शेअर बाजार वाढीव पातळीवर असताना देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि सरकारने दिलेल्या पॅकेजबद्दलची नाराजी त्यामुळे मुंबई तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये निर्देशांक खाली आले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक दिवसभरात १०६८.७५ अंशांनी घसरून ३००२८.९८ अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्येही ३.४३ टक्क्यांनी घट झाली. हा निर्देशांक ३१३.६० अंश खाली येऊन ८८२३.२५ अंशांवर बंद झाला.बाजारात वित्तीयसंस्था तसेच वाहन उद्योगाच्या समभागांना विक्रीचा मोठा फटका बसला. यामध्ये एचडीएफसी, मारूती सुझुकी, अ‍ॅक्सिस बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट हे समभाग सुमारे १० टक्क्यांनी घटले. टीसीएस, एन्फोसीस, आयटीसी आणि एचसीएल टेक या समभागांच्या किमती वाढलेल्या दिसून आल्या.रिलायन्सच्या समभागांना मागणी वाढलेली दिसून आली. कंपनीचा राईट इश्यू या सप्ताहातच खुला होत आहे. याशिवाय जनरल अ‍ॅटलांटिक या अमेरिकन कंपनीने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये केलेल्या गुंतवणुकीने समभाग वाढले.

टॅग्स :शेअर बाजार