Join us

मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:29 IST

mukesh ambani meet trump : सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तानमधील मध्यस्थीच्या दाव्यावरुन वाद सुरू असताना, आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

mukesh ambani meet trump : सध्या भारत-पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली की नाही यावरुन वादविवाद सुरू आहेत. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार मी मध्यस्थी केल्याने दोन्ही देशात युद्धविराम झाला. तर भारत सरकारकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ट्रम्प सध्या सौदी अरेबिया, कतार आणि यूएईच्या दौऱ्यावर आहेत आणि याच दरम्यान ही भेट झाली.

कतारमध्ये झाली भेटसौदी अरेबियामध्ये अमेरिकेने मोठा संरक्षण करार केल्यानंतर, ट्रम्प कतारची राजधानी दोहा येथे पोहोचले. तिथे त्यांनी कतार आणि अमेरिकेत अनेक करार केले. याच वेळी मुकेश अंबानी यांनी दोहामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी कतारसोबत कच्च्या तेलाचा व्यापार करते. कतार, सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये रिलायन्सचा मोठा व्यवसाय आहे.

रिलायन्स रिटेलमध्ये कतारची गुंतवणूकरिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने (QIA) रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये (Reliance Retail Ventures Ltd - RRVL) १ टक्का हिस्सा खरेदी करण्यासाठी ८,२७८ कोटी रुपये गुंतवले आहेत. यासाठी रिलायन्स रिटेलने क्यूआयएला ६.८६ कोटी शेअर्स दिले आहेत. यामुळे क्यूआयएला रिलायन्स रिटेलमधील ०.९९ टक्के मालकी मिळाली आहे.

अंबानींनी दिली होती माहितीमुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेत सांगितले होते की, अनेक मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांनी रिलायन्स रिटेलमध्ये रस दाखवला आहे. त्यांनी असेही म्हटले होते की, जर रिलायन्स रिटेल शेअर बाजारात लिस्ट झाली, तर तिच्या सध्याच्या किंमतीनुसार ती देशातील टॉप ४ कंपन्यांमध्ये असेल. अंबानी म्हणाले होते की, रिलायन्स रिटेलची किंमत ३ वर्षांपेक्षा कमी वेळेत दुप्पट झाली आहे.

रिलायन्स रिटेलचे मोठे मूल्यकतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने रिलायन्स रिटेलमध्ये ८,२७८ कोटी रुपये गुंतवल्यानंतर, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे एकूण बाजार मूल्य (Market Value) १०० अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.

आरआरव्हीएल काय आहे?आरआरव्हीएल ही रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाची होल्डिंग कंपनी आहे. २०२० मध्ये या कंपनीने अनेक जागतिक गुंतवणूकदारांकडून १०.०९ टक्के हिस्सा विकून ४७,२६५ कोटी रुपये जमा केले होते, ज्यामुळे कंपनीचे मूल्य ४.२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले होते.

वाचा - अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..

मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमुळे आता नवीन चर्चा सुरू झाली आहे. या भेटीचा दोन्ही देशांच्या व्यावसायिक संबंधांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

टॅग्स :मुकेश अंबानीडोनाल्ड ट्रम्पअमेरिकाकतार