Join us  

बिल गेट्स यांच्या कंपनीत मुकेश अंबानी करणार गुंतवणूक, मोठा आहे रिलायन्सचा प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 3:25 PM

रिलायन्सने दिलेल्या माहितीनुसार, या प्रयत्नांमुळे भारत आणि देशातील जनतेला मोठा फायदा होईल.

नवी दिल्ली -मुकेश अंबानी जगातील दुसऱ्या  क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांच्या कंपनीत गुंतवणूक करणार आहेत. या कंपनीचे नाव ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्स, असे आहे. याकंपनीत रिलायन्स इंडस्ट्रीज 5 कोटी डॉलर अर्थात 371 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भातील माहिती खुद्द मुकेश अंबानी यांनीच शेअर बाजारात रेग्यूलेटरी फायलिंगमध्ये दिली आहे.

अशी आहे गुंतवणूक योजना -मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स हे ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्सचे नेतृत्व करत आहेत. मुकेश अंबानी यांचा ग्रुप आरआयएलनुसार, 5 कोटी डॉलरचे योगदान, गुंतवणुकीच्या 5.75 टक्के आहे. या ग्रुपमध्ये कंपनी साधारणपणे 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करणार आहे. ऊर्जा आणि शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करून हवामान संकटाचे निराकरण करण्याची ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्सची योजना आहे. कंपनी क्लीन एनर्जी सोल्यूशन्समध्ये इनोव्हेशनला सपोर्ट करण्यासाठी गुंतवणुकदारांकडून एकत्रित केलेला निधी गुंतवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

संपूर्ण देशाला होईल फायदा -रिलायन्सने दिलेल्या माहितीनुसार, या प्रयत्नांमुळे भारत आणि देशातील जनतेला मोठा फायदा होईल. तसेच गुंतवणूकदारांनाही चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. रिलायन्सने दिलेल्या माहितीनुसार, या ट्रांझेक्शनला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. ही गुंतवणूक गुंतवणूकीशी संबंधित पार्टी व्यवहाराअंतर्गत येत नाही. तसेच आरआयएलच्या कुठल्याही प्रमोटरचे, प्रमोटर ग्रुपचे अथवा ग्रुप कंपनीचे यात कसल्याही प्रकारचे हीत नाही.

आता रिटेल क्षेत्रातही भूकंप घडवण्याच्या तयारीत अंबानी - भारतातील सर्वात श्रीमंत कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) दूरसंचार क्षेत्रात वादळ आणल्यानंतर आता ऑनलाईन रिटेल क्षेत्रातही भूकंप घडवण्याच्या तयारीत आहे. मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स जिओने स्वस्त डाटा आणि कॉलिंग प्लॅन्सची रणनीती वापरली होती. याच धर्तीवर आता पुन्हा ई-कॉमर्स क्षेत्रातही कंपनी अशीच रणनीती वापरण्याच्या तयारीत आहे. 

मुकेश अंबानी दिवाळी सेलच्या माध्यमाने प्रतिस्पर्धक कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे दीर्घकाळापासून भारताच्या ई-कॉमर्स बाजारात जम बसवलेल्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. कारण जिओ मार्टने मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीबिल गेटसरिलायन्स