Join us  

जगातील अब्जाधीश कशी वाटतात संपत्ती?; मुकेश अंबानी शोधताहेत फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 12:24 PM

मुकेश अंबानी संपत्तीचं वाटप करण्याच्या तयारीत; वॉल्टन मॉडेलनुसार संपत्ती वाटप होण्याची शक्यता

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) त्यांचं २०८ अब्ज डॉलरचं साम्राज्य नव्या पिढीच्या हातात सोपवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते एक नवी योजना आखत आहेत. पुढे जाऊन कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी अंबानी प्रयत्नशील आहेत. जगभरातील अब्जाधीश कुटुंबं उत्तराधिकारी कसं निवडतात, संपत्तीचं वाटप कसं करतात, याच्या विविध प्रारुपांचा अभ्यास सध्या अंबानी करत आहेत.

संपत्तीच्या वाटपासाठी मुकेश अंबानी वॉल्टनपासून कोच कुटुंबापर्यंतचा अभ्यास करत आहेत. अंबानींनी गेल्या काही दिवसांपासून या प्रक्रियेला वेग दिल्याचं वृत्त ब्लूमबर्गनं दिलं आहे. ६४ वर्षांच्या मुकेश अंबानींना वॉलमार्ट इंकच्या वॉल्टन कुटुंबाचं प्रारुप सर्वाधिक आवडलं आहे. ते कुटुंबाच्या होल्डिंगला एका ट्रस्टमध्ये टाकू इच्छितात. ही ट्रस्ट देशातील सर्वाधिक मूल्य असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडवर नियंत्रण ठेवेल. अंबानी, त्यांची पत्नी नीता आणि तीन मुलांचा या नव्या एंटीटीमध्ये हिस्सा असेल. त्यांचा समावेश बोर्डमध्ये असेल. या बोर्डात अंबानी कुटुंबातील सदस्य सल्लागाराच्या भूमिकेत असतील.

कंपनीचं व्यवस्थापन प्रोफेशनल व्यक्तींच्या हाती असेल. ही मंडळी रिलायन्सचा कारभार पाहतील. रिलायन्स उद्योग समूह रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स, टेलिकम्युनिकेशन्स, ई-कॉमर्स, ग्रीन एनर्जी क्षेत्रांमध्ये पसरला आहे. अंबानी सध्या विविध पर्यायांचा विचार करत आहेत. मात्र त्यांनी अद्याप तरी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. ब्लूमबर्गनं याबद्दलची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी रिलायन्सच्या प्रतिनिधींना ईमेल आणि कॉल केले होते. मात्र त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही.

मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचं चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पद सोडण्याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र त्यांची मुलं व्यवसायात आता अधिक सक्रिय होऊ लागली आहेत. जूनमध्ये मुकेश यांनी शेअरहोल्डर्सना संबोधित करताना याबद्दलचे संकेत दिले होते. आकाश, इशा आणि अनंत रिलायन्समध्ये महत्त्वाची भूमिका निभावतील असं अंबानी म्हणाले होते. रिलायन्सचे संस्थापक धीरुबाई अंबानी यांच्यानंतर मुकेश आणि अनिल यांच्या संपत्तीवरून वाद झाला होता. त्याची पुनरावृत्ती घडू नये याची काळजी मुकेश अंबानी घेताना दिसत आहेत. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स