Join us

पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:22 IST

Mukesh Ambani on Pahalgam Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

Mukesh Ambani on Pahalgam : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. सामान्य माणूस असो किंवा विशेष व्यक्ती, निष्पाप आणि निशस्त्र पर्यटकांवरील भ्याड हल्ल्यानंतर सर्वांनाच दुःख आणि धक्का बसला आहे. देशच नाही तर विदेशातूनही लोक या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहेत. घटनेनंतर भारत सरकारनेही पाकिस्तानबाबत अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. आता देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. याचवेळी हल्ल्यातील जखमींसाठी एक मोठी घोषणा देखील केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश धीरूभाई अंबानी म्हणाले, “पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांच्या मृत्युबद्दल रिलायन्स कुटुंब दुःख व्यक्त करते. आम्ही पीडित कुटुंबांना आमच्या मनापासून सहवेदना व्यक्त करतो. हल्ल्यात जखमी झालेले सर्वजण जलद आणि पूर्ण बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करतो. मुंबईतील आमचे रिलायन्स फाउंडेशन सर एचएन हॉस्पिटल सर्व जखमींना मोफत उपचार देईल."

ते पुढे म्हणाले, "दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. त्याचे कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही व्यक्तीने समर्थन करू नये. दहशतवादाच्या धोक्याविरुद्धच्या निर्णायक लढाईत आम्ही माननीय पंतप्रधान, भारत सरकार आणि संपूर्ण देशासोबत आहोत."

वाचा - सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यंटकांवर हल्ला झाला. यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे. आता लोक तिथे जायलाही भीत आहेत. पहलगाममध्ये जिथं हा हल्ला झाला त्या भागाला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हटलं जातं. या ठिकाणी फक्त देशातूनच नाही तर विदेशातूनही पर्यटक येतात. मात्र, २२ एप्रिलला दुपारी येथील दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात २९ निष्पाप लोक बळी पडले.