Join us

मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 10:50 IST

Mukesh Ambani News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिअल इस्टेट कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या परदेशी विकासकांच्या यादीत भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा ही समावेश झाला आहे.

Mukesh Ambani News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिअल इस्टेट कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या परदेशी विकासकांच्या यादीत भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा ही समावेश झाला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनं यासंदर्भातील बातमी दिली. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स 4 आयआर रियल्टी डेव्हलपमेंटने मुंबईतील एका रिअल इस्टेट प्रकल्पासाठी ट्रम्प ब्रँडचा परवाना घेण्यासाठी ट्रम्प ऑर्गनायझेशनला १ कोटी डॉलर्सची (सुमारे ८६.५ कोटी रुपये) 'डेव्हलपमेंट फी' भरली आहे. रिलायन्स 4IR रियल्टी डेव्हलपमेंट हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे युनिट आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलनं दिलेल्या वृत्तानुसार, वर्षानुवर्षे व्यवसायांना जागतिक राजकारणापासून दूर ठेवल्यानंतर ट्रम्प कुटुंबीय आता कामकाज वाढवत आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वार्षिक आर्थिक अहवालानुसार, व्हिएतनाम, दुबई आणि सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये ट्रम्प ब्रँडेड प्रकल्पांची योजना आखणाऱ्या गुंतवणूकदारांनी २०२४ मध्ये ट्रम्प ऑर्गनायझेशनला ४.४६ कोटी डॉलर्सचं परदेशी परवाना आणि विकास शुल्क भरलं. वॉल स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार हा आकडा २०२३ मध्ये ८२ लाख डॉलर्स आणि २०२२ मध्ये ९४ लाख डॉलर्स होता. याचाच अर्थ ट्रम्प यांच्या व्यवसायात परकीय गुंतवणूक झपाट्यानं वाढत आहे.

युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव

भारताशी संबंधित मोठी डील

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि ट्रम्प ऑर्गनायझेशन यांच्यात एक मोठा करार झाला आहे. हा करार ट्रम्प कुटुंबाचा भारताशी संबंधित सर्वात मोठा व्यवसाय करार आहे. या अंतर्गत, अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची एक युनिट, रिलायन्स 4IR रिअॅलिटी डेव्हलपमेंट, मुंबईतील रिअल इस्टेट प्रकल्पासाठी ट्रम्प ब्रँडचा वापर करेल. यासाठी, कंपनीनं ८६.५ कोटी रुपयांची 'डेव्हलपमेंट फी' भरली आहे. हा करार ट्रम्प ऑर्गनायझेशनचे आंतरराष्ट्रीय व्यवसायात पुनरागमन दर्शवतो. २०२४ मध्ये त्यांचं परदेशी परवाना उत्पन्न पाच पटीनं वाढलंय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, ट्रम्प ऑर्गनायझेशननं २०२४ मध्ये परवाना आणि विकास शुल्कातून जगभरात ३,८५४.९ कोटी रुपये कमावलेत. २०२३ मध्ये हा आकडा फक्त ७०९.३ कोटी रुपये होता.

मुंबईत बांधल्या जाणाऱ्या प्रकल्पाबद्दल अद्याप फारशी माहिती नाही. परंतु, रिलायन्स कंपनी ट्रम्प ब्रँडसोबत काम करत आहे अशी ही पहिलीच वेळ आहे. अंबानींचा व्यवसाय पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉम आणि रिटेल अशा क्षेत्रात पसरलेला आहे. आता त्यांची कंपनी रिअल इस्टेटमध्येही वाढत आहे. कंपनी मुंबईत ४,००० एकर जमिनीवर एक मोठा प्रकल्प बांधण्याची योजना आखत आहे. रिलायन्स ग्रुप आणि ट्रम्प कुटुंबानं या करारावर कोणतेही विधान केलेलं नाही.

टॅग्स :मुकेश अंबानीडोनाल्ड ट्रम्पव्यवसाय