Budget 2025 : गेल्या काही वर्षातील निवडणुकींमध्ये महिलांचे मतदान प्रभावी ठरलं आहे. काही राज्यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकारही आपल्या अर्थसंकल्पात अशीच काही योजना जाहीर करेल अशी महिलांना अपेक्षा होती. मात्र, महिलांसाठी एकही योजना जाहीर करण्यात आली नाही. याउलट महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची मुदत वाढवण्याबाबतही काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे ही योजना आता बंद होण्याची शक्यता आहे.
३१ मार्च २०२५ रोजी सरकारी योजना बंद होणारअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एमएसएससी योजनेची अंतिम मुदत वाढवण्याबाबत एकही शब्द काढला नाही. याचा सरळ अर्थ असा की ही योजना ३१ मार्च २०२५ रोजी संपणार असून १ एप्रिल २०२५ पासून या योजनेत नवीन गुंतवणूक करता येणार नाही. अशा परिस्थितीत देशातील कोट्यावधी महिलांकडे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ ३१ मार्चपर्यंतच वेळ आहे. ३१ मार्चनंतर या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही.
अल्पमुदतीची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनामहिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारद्वारे खास महिलांसाठी ही बचत योजना चालवली जाते. या योजनेवर ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. एमएसएससी योजनेअंतर्गत एकरकमी गुंतवणूक करता येते. यामध्ये किमान १००० रुपये गुंतवले जाऊ शकतात. शिवाय, तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवू शकता. ही सरकारी योजना २ वर्षात परिपक्व होते. देशातील कोणतीही महिला या योजनेत खाते उघडू शकते. यामध्ये खाते उघडण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे तुम्हाला या संधीचा लाभ घेण्यासाठी शेवटची संधी आहे.