BSNL 4G Live : भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या ४जी नेटवर्कच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. यावर्षी बीएसएनएल आपली ४जी सेवा पूर्णपणे लाँच करणार आहे, त्यानंतर युजर्सना चांगला अनुभव मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बीएसएनएलनंही आपल्या ५जी नेटवर्कवर काम सुरू केलंय. ४जी नेटवर्कपाठोपाठ बीएसएनएल युजर्सना लवकरच ५जी सेवेचाही लाभ मिळू लागणारे. बीएसएनएलचे ६५ हजारांहून अधिक ४जी टॉवर्स लाईव्ह करण्यात आल्यानं बीएसएनएलनं आपल्या लाखो युजर्सना खूश केलंय. त्यामुळे बीएसएनएल युजर्सना आता चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणारे.
६५ हजार टॉवर्स लाइव्ह
बीएसएनएलने आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करून ६५,००० हून अधिक ४जी टॉवर्स लाइव्ह करण्याची घोषणा केली आहे. बीएसएनएलनं, युझर्सना आता चांगली कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्क कव्हरेज मिळणार असल्याचं म्हटलं. दरम्यान, या वर्षात बीएसएनएल आपली ४जी सेवा देशभरात व्यावसायिकरित्या सुरू करणार आहे. बीएसएनएल देखील आपल्या ५जी नेटवर्कची चाचणी घेत आहे. यासाठी बीएसएनएलने टाटासोबत भागीदारी केलीये.
३जी होणार बंद
बीएसएनएल आपल्या ३जी नेटवर्कला फेज आऊट करत आहे, जेणेकरून ४जी आणि ५जी टॉवर स्थापित केले जाऊ शकतात. बीएसएनएलनं बिहार टेलिकॉम सेवेतील थ्रीजी सेवा टप्प्याटप्प्याने बंद केली आहे. युजर्संना आता थ्रीजीऐवजी ४जी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. जर तुम्हीही बीएसएनएल युजर असाल तर तुम्ही तुमचं सिम कार्ड ४जी मध्ये अपग्रेड करू शकता.