Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनी लाँड्रिंग प्रकरण, कोचर यांच्यासह रुईया यांच्या जावयाची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 04:17 IST

व्हिडीओकॉन उद्योग समूहाला आयसीआयसीआय बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जाच्या चौकशीची कक्षा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाढविली आहे.

नवी दिल्ली : व्हिडीओकॉन उद्योग समूहाला आयसीआयसीआय बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जाच्या चौकशीची कक्षा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाढविली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्यासह मॉरिशस येथील मॅटिक्स समूहाचे प्रमुख निशांत कनोदिया यांची ईडीने चौकशी केली आहे. कनोदिया हे एस्सार उद्योग समूहाचे चेअरमन रवी रुईया यांचे जावई आहेत.निशांत कनोदिया यांच्या मालकीच्या फर्स्टलँड होल्डिंग्ज या कंपनीने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीच्या नूपॉवर रिन्युएबल्स या कंपनीत तब्बल ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहाने २०१०-११ मध्ये एस्सार समूहातील एस्सार स्टीलला ५८० दशलक्ष डॉलरचे कर्ज दिले होते. चंदा कोचर या तेव्हा आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ होत्या.या कर्जाच्या बदल्यात एस्सार समूहाकडून कनोदिया यांच्या मॉरिशस येथील कंपनीमार्फत दीपक कोचर यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यात आली असावी, असा ईडीला संशय आहे. एस्सार समूहाला कर्ज दिल्यानंतर त्याची परतफेडच झाली नाही, हे कर्ज लगेचच एनपीएमध्ये गेले. कोचर यांच्या विरोधात कारवाई सुरू झाल्यानंतर एस्सार समूहाने या कर्जाची परतफेडीची प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त आहे.>अनेक प्रकरणांची चौकशी?आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन उद्योग समूहाला दिलेल्या ३,२५० कोटी रुपयांच्या कर्जाची चौकशी ईडीकडून सुरू आहे. या चौकशीदरम्यान, एस्सार समूहाशी संबंधित अशाच कर्जाची माहिती समोर आल्यामुळे ईडीने चौकशीची व्याप्ती वाढविली आहे. सूत्रांनी सांगितले की, चंदा कोचर यांच्या कार्यकाळात दिल्या गेलेल्या आणखीही काही औद्योगिक कर्जांची चौकशी केली जाऊ शकते.

टॅग्स :चंदा कोचर