Join us  

किसान विकास पत्रात गुंतवलेले पैसे वेगानं होतायत दुप्पट, जाणून घ्या किती मिळतो फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 12:27 PM

1 ऑक्टोबरपासून छोट्या छोट्या सरकारी योजनांवर जास्त व्याज मिळण्यास सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली- 1 ऑक्टोबरपासून छोट्या छोट्या सरकारी योजनांवर जास्त व्याज मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास ही चांगली संधी आहे. त्यातच सरकारची एक अशी योजना आहे की तिच्यात तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला वेगानं फायदा मिळत आहे. सरकारची छोटी बचत योजना असलेल्या किसान विकास पत्र(KVP)ची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. या योजनेचा लाभ तुम्ही शेजारील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनही मिळवू शकता. या योजनेत 1000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. 

  • काय आहे किसान विकास पत्र- हे एक असं प्रमाणपत्र आहे जे कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते. बाँडप्रमाणेच हे प्रमाणपत्र जारी केलं जातं. यावर चांगलं व्याज मिळतं. तसेच या योजनेवरील व्याजाचे दर सरकार वेळोवेळी बदलत असते. ही योजनेअंतर्गत देशातल्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडता येऊ शकते. 1 ऑक्टोबर 2018पासून या योजनेवर 7.7 टक्के व्याज मिळत आहे. 
  • किती पैशाची करावी लागेल गुंतवणूक- किसान विकास पत्रमध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही उच्च मर्यादा नाही. परंतु तुम्ही त्या खात्यात 1000 रुपये गुंतवलेले असावेत. 1 हजार रुपयांपेक्षा जास्त तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता. म्हणजेच तुम्ही 1500, 2500, 3500 रुपयांची गुंतवणूक करू शकता. 
  • कोण खरेदी करू शकतं- देशातल्या पोस्ट ऑफिसमधल्या कोणत्याही शाखेतून तुम्ही किसान विकास पत्र खरेदी करू शकता. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांसाठीही तुम्ही हे विकास पत्र खरेदी करू शकता. दोन व्यक्तींच्या नावेसुद्धा हे विकास पत्र खरेदी केलं जाऊ शकतं. 
  • किती वेळेनंतर काढू शकता पैसे- तुम्ही एकदा गुंतवणूक केल्यानंतर कमीत कमी 2.5 वर्षांची वाट पाहू शकता. परंतु दीर्घकाळासाठी पैसे गुंतवल्यास जास्त नफा मिळतो. 
  • किती वेळेत दुप्पट होतो पैसा- तुम्ही किसान विकास पत्रमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.7 टक्क्यांच्या व्याजदरानं नफा मिळतो. जेणेकरून तुमचे पैसे 118 महिने म्हणजे 9 वर्षं आणि 10 महिन्यात दुप्पट होतील. 
  • काय डॉक्युमेंट द्यावे लागतील- 2 पासपोर्ट साइज फोटो, ओळखपत्र(रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आदी), निवास प्रमाणपत्र(विजेचं बिल, टेलिफोन बिल, बँक पासबुक), तुम्ही 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला पॅन कार्ड गरजेचं असतं. तसेच आधार कार्ड(ऑक्टोबर 2017मध्ये सरकारनं बंधनकारक केलं आहे.)
  • यात आणखी काय सुविधा मिळतात- या सरकारी योजनेत तुम्हाला नॉमिनेशनचीही सुविधा मिळते. एक व्यक्ती दुस-या व्यक्तीच्या नावे हे पत्र हस्तांतरित करू शकतो. देशातील काही बँकांमध्ये हे ऑनलाइन पद्धतीनंही खरेदी करता येऊ शकते. 
  • टॅक्समधून मिळते सूट- किसान विकास पत्रमध्ये तुम्हाला टॅक्समधून सूट मिळते. या योजनेंतर्गत टॅक्स घेतला जात नाही. म्हणजे तुमच्या पॉलिसीची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर टीडीएस न कापता तुम्हाला पूर्ण रक्कम मिळणार आहे. 
टॅग्स :पोस्ट ऑफिस