Join us

मार्केटमधील पैसा करणार कमी; सलग चौथ्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 06:51 IST

किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर ६.८३ टक्के इतका उच्च असतानाही हा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला.

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी सलग चौथ्यांदा धोरणात्मक व्याज दर म्हणजेच रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला. किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर ६.८३ टक्के इतका उच्च असतानाही हा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला.

पतधोरण समितीच्या बैठकीच्या समाप्तीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, एमपीसीच्या सर्व ६ सदस्यांनी रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याच्या बाजूने कौल दिला. दास यांनी सांगितले की, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रोखे विक्रीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त रोख काढून घेतली जाईल.

रेपो दर कायम राहिल्यामुळे गृहकर्जासह वाहन व अन्य कर्जांच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नाही. तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने कर्ज घेतात त्यास रेपो दर म्हटले जाते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक