Join us  

वृत्तपत्रांच्या हेडलाइन्स बनण्याऐवजी मोदींनी सुस्त अर्थव्यवस्थेला गती द्यावी- मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 8:59 PM

अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती आणि केंद्र सरकारची भूमिका यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टीका केली आहे.

नवी दिल्लीः अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती आणि केंद्र सरकारची भूमिका यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टीका केली आहे. वृत्तपत्रांच्या हेडलाइन्स बनण्याऐवजी मोदींनी सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढून गती द्यावी, असंही मनमोहन सिंग म्हणाले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांचा मोदी सरकारनं सामना करण्याची गरज आहे. अर्थव्यवस्था संकटात असतानाच मनमोहन सिंग यांनी मोदींवर निशाणा साधल्यानं राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरत आहे. देशाच्या विकासदरात दिवसेंदिवस घसरण होत असून, तो फक्त पाच टक्क्यांवर खोळंबला आहे. या सर्व गोष्टी पाहून 2008मधल्या परिस्थितीची आठवण झाली. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि तेव्हाही अर्थव्यवस्थेला घरघर लागली होती. तेव्हा अर्थव्यवस्थेतील घसरण ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक कारणांमुळे झाली होती. त्या आव्हानांना स्वीकार करून आम्ही त्यांचा एकत्रितरीत्या सामना केला आणि अर्थव्यवस्थेला घसरणीतून बाहेर काढून बळकटी मिळवून दिली.  रिअल इस्टेट क्षेत्र, कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस घसरण होत चालली आहे. मोदी सरकारनं या परिस्थितीतून शेतकरी आणि बिल्डरांना बाहेर न काढल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होऊ शकतो. सरकारनं लोकांवर विश्वास ठेवण्याची गरज असून, पारदर्शी कारभार केला पाहिजे. परंतु देशाचं दुर्दैव आहे की, मोदी सरकारकडून काहीही प्रयत्न होताना दिसत नसल्याचंही मनमोहन सिंग म्हणाले आहेत. 

टॅग्स :मनमोहन सिंग