Mobile Recharge Hike: काही वर्षांपूर्वी १००-१५० रुपयांवर असलेली रिचार्ज आता २५०-३५० रुपयांवर गेली आहेत. गेल्याच वर्षी जिओने याचा श्रीगणेशा केला होता. आता वर्ष होत नाही तोच पुन्हा मोबाईल रिचार्ज १० ते १२ टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. जे मोठ्या आणि मध्यम किंमतीची रिचार्ज करतात त्यांच्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे.
मे महिन्यात अॅक्टीव्ह मोबाईल युजर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हेच कारण कंपन्यांनी पुढे केले आहे. हे वाढते ग्राहक पाहून कंपन्या या वर्षाच्या अखेरीपर्यंत पुन्हा एकदा रिचार्जचे दर वाढविण्याचा विचार करत आहेत. जर कंपन्यांनी दर वाढविले तर ग्राहक पुन्हा एकदा आपले नंबर पोर्ट करण्याकडे वळू शकतात, असाही इशारा जाणकारांनी दिला आहे.
कंपन्या दर वाढविण्याबरोबरच डेटा लिमिट देखील कमी करण्याच्या विचारात असल्याचे इकॉनॉमिक टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. यामुळे ग्राहकांना वारंवार डेटासाठी रिचार्ज करावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे कंपन्या स्वस्त डेटा पॅक आणत आहेत. त्यांना याची हळू हळू सवय लावायची आहे, या डेटा पॅक्सवर लोक येऊ लागले की ते महाग केले जातील आणि कंपन्या त्यातूनही पैसे छापतील, असे या वृत्तात म्हटले आहे.
एकट्या मे महिन्यात कंपन्यांचे ७४ लाख अॅक्टीव्ह युजर्स वाढले. गेल्या २९ महिन्यांत ही रेकॉर्डब्रेक संख्या आहे. यामुळे देशात अॅक्टीव्ह युजर्सची संख्या १०८ कोटी झाली आहे. गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबरमध्ये २.१ कोटी युजर कमी झाले होते. परंतू, गेल्या पाच महिन्यांपासून वाढ होऊ लागली आहे. यात नेहमीप्रमाणे जिओने ५५ लाख युजर जोडले आहेत. यामुळे त्यांचा वाटा हा ५३ टक्के झाले आहे. तर एअरटेलने १३ लाख युजर जोडत आपला वाटा ३६ टक्के केला आहे.
बीएसएनएलची सेवा दिवसेंदिवस वाईट अवस्थेत जात आहे. अनेक ठिकाणी रेंज असते पण मोबाईलमध्ये ती नसते. डेटा सुरु असूनही सुरु राहत नाही, अनेकदा मोबाईल फ्लाईट मोड करून पुन्हा बंद करून रेंज घ्यावी लागते. एवढी वाईट अवस्था बीएसएनएलची आहे. अनेकदा फोनच लागत नाहीत, लागले तर आवाज ऐकायला जात नाही. ३जी, ४जी येत असले तरी स्पीड काही मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे. तर व्होडाफोनचे ग्राहक एकामागोमाग एक करून सगळे सोडून जाऊ लागले आहेत.