Join us

इन्कम टॅक्सची डेडलाइन चुकली, आता? आता ३१ डिसेंबरपर्यंत दंडासह भरा आयटीआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 09:29 IST

दंड : कलम २३४फ अनुसार ५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना १,००० रुपये, तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना ५,००० दंड.

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२४-२५ (मूल्यमापन वर्ष २०२५-२६)साठी आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर २०२५ पर्यंतच होती. आयकर विभागाने ही तारीख आणखी वाढवलेली नाही. त्यामुळे ज्यांनी १६ सप्टेंबरपूर्वी विवरणपत्र दाखल केलेले नाही, त्यांना आता ‘विलंबाचे विवरणपत्र’ (बिलेटेड रिटर्न) दाखल करावे लागेल. येत्या ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ‘विलंबित विवरणपत्र’ भरता येईल; मात्र त्यावर दंड, व्याज आणि इतर निर्बंध लागू होतील.

दंड : कलम २३४फ अनुसार ५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना १,००० रुपये, तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना ५,००० दंड.

व्याज : न भरलेल्या करावर कलम २३४अ, २३४ब, २३४क नुसार व्याज लागते.

कॅरी-फॉरवर्ड तोटा मर्यादित : फक्त न वापरलेला घसारा (डेप्रिसिएशन) व घर अथवा जागेवरील तोटा पुढे नेता येईल.

परताव्याला विलंब : उशिराच्या आयटीआरचा परतावा (रिफंड) नेहमीपेक्षा उशिरा मिळतो.

अधिक तपासणी : अशा आयटीआरवर कर अधिकाऱ्यांकडून अधिक छाननी होण्याची शक्यता असते.

मुदतवाढ  का मिळाली?

साधारणपणे आयटीआर भरण्याची मुदत दरवर्षी ३१ जुलै असते. पण यंदा नवीन फॉर्मसाठी आयकर ई-फायलिंग पोर्टलमध्ये बदल करण्याची गरज भासल्याने ती १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

मात्र तांत्रिक अडचणीमुळे विभागाने अंतिम मुदत एक दिवसाने वाढवून १६ सप्टेंबर केली होती. त्यानंतरही काहींना पोर्टल वापरण्यात अडचणी आल्या. मात्र, मुदतवाढ दिली नाही.