Company Gift : प्रत्येकाला मनासारखं काम आणि समजून घेणारा बॉस हवा असतो. पण, प्रत्येकाच्या वाट्याला असे बॉस येतातच असे नाही. पण, काही बॉस फक्त चांगल्या मनाचेच नाही तर विशाल हृदयाचेही असतात. अशाच एका दिलदार बॉसची चर्चा सध्या जगभरात होत आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कपडे कंपनी स्पॅन्क्स (Spanx) च्या संस्थापक आणि सीईओ सारा ब्लेकली यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे केलंय त्याची जगभर चर्चा सुरू आहे.
स्पॅन्क्स कंपनीने ब्लॅकस्टोनसोबत १.२ अब्ज डॉलर्सचा (सुमारे ९९०० कोटी रुपये) मोठा करार केला. या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी, सारा ब्लेकली यांनी आपल्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांसाठी एक अविस्मरणीय भेट जाहीर केली. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला जगात कुठेही जाण्यासाठी दोन प्रथम श्रेणीच्या विमान तिकिटे (First Class Air Tickets) आणि खर्चासाठी १०,००० डॉलर्स (सुमारे ८.५ लाख रुपये) रोख दिले!
पार्टीत झाली 'करोडो रुपयांची' घोषणा!कंपनीच्या पार्टीदरम्यान ही घोषणा करण्यात आली, तेव्हा कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सारा ब्लेकली यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर या क्षणाचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात कर्मचाऱ्यांचा उत्साह स्पष्टपणे दिसत होता. काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते या भेटवस्तूचा वापर आपल्या हनिमूनसाठी, स्वीडनमधील लग्नासाठी किंवा दक्षिण आफ्रिका, क्रोएशिया आणि अगदी अंटार्क्टिकासारख्या दूरच्या ठिकाणी सहलीसाठी करणार आहेत. हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
कंपनीला किती खर्च आला?रोख रक्कम: ५०० कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी १०,००० डॉलर्स म्हणजे एकूण ५० लाख डॉलर्स (सुमारे ४१.५० कोटी रुपये).विमान तिकिटे: प्रथम श्रेणीच्या तिकिटाची किंमत ठिकाणानुसार बदलते, पण सरासरी प्रत्येक तिकिटासाठी ५,००० डॉलर्स गृहीत धरल्यास, दोन तिकिटांसाठी १०,००० डॉलर्स. ५०० कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम ५० लाख डॉलर्स (सुमारे ४१.५० कोटी रुपये) होईल.एकूण खर्च: अशा प्रकारे, ब्लेकली यांनी कर्मचाऱ्यांवर सुमारे १ कोटी डॉलर्स (२०२१ च्या विनिमय दरानुसार, सुमारे ८३ कोटी रुपये!) खर्च केले. ही खरंच एक मोठी रक्कम आहे. यावरुन या बॉसचे हृदय किती विशाल आहे, याची प्रचिती येते.
स्पॅन्क्स कंपनी काय करते?स्पॅन्क्स ही एक अमेरिकन कंपनी आहे, जी प्रामुख्याने शेपवेअर, लेगिंग्ज, अंडरगारमेंट्स आणि इतर कपडे डिझाइन करून बनवते. २००० साली सारा ब्लेकली यांनी या कंपनीची स्थापना केली होती. शरीराला स्लिम आणि आकर्षक लूक देणारे आरामदायी आणि स्टायलिश कपडे प्रदान करणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. कंपनीने नंतर जीन्स, स्विमवेअर आणि पुरुषांसाठीही शेपवेअर यांसारख्या उत्पादनांनी आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे. स्पॅन्क्सचे मुख्यालय अटलांटा, जॉर्जिया येथे असून, त्यांची उत्पादने जगभरात ऑनलाइन आणि मोठ्या रिटेल स्टोअर्समध्ये विकली जातात.
वाचा - खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
सारा ब्लेकली यांचे हे पाऊल केवळ कर्मचाऱ्यांचा आनंद वाढवणारे नव्हते, तर ते कंपन्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे की कर्मचाऱ्यांच्या कष्टाची आणि योगदानाची कदर कशी करावी. अशा दिलदारपणाने कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती अधिक निष्ठा आणि उत्साह निर्माण होतो!