Join us

दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:19 IST

Milk Price Drops : केंद्र सरकारने अलीकडेच जीएसटीमध्ये मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे अमूल आणि मदर डेअरीच्या किमती कमी होऊ शकतात.

Milk Price Drops : जीएसटी कपातीनंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, रोजच्या वापरातील अनेक गोष्टींच्या किमती आता कमी होण्याची शक्यता आहे. तुम्हीही याचीच वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एका दिलासादायक बातमी आहे. २२ सप्टेंबर २०२५ पासून अमूल आणि मदर डेअरी यांसारख्या प्रमुख दुग्ध ब्रँड्सच्या दुधाच्या किमतींमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत दूध आणि पनीरसारख्या आवश्यक वस्तूंवरील ५% जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यानंतर हा बदल अपेक्षित आहे.

किती कमी होऊ शकते किंमत?जीएसटी हटवल्यामुळे दुधाच्या किमतींमध्ये प्रति लिटर २ ते ४ रुपयांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. यामुळे दररोज दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांना वार्षिक शेकडो रुपयांची बचत होईल. उदाहरणार्थ, अमूल गोल्ड (फुल क्रीम) दुधाची किंमत ६९ रुपये वरून ६५ रुपयांपर्यंत खाली येऊ शकते, तर मदर डेअरी टोंड दूध ५७ रुपयांऐवजी ५४ रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकते.

अमूल आणि मदर डेअरीच्या नवीन संभाव्य किमतीजीएसटी कपातीनंतर विविध प्रकारच्या दुधाच्या संभाव्य नवीन किमती खालीलप्रमाणे असू शकतात.अमूल

  • गोल्ड (फुल क्रीम): सध्याची किंमत ६९ रुपये, नवीन संभाव्य किंमत ६५-६६ रुपये
  • ताझा (टोन्ड): सध्याची किंमत ५७ रुपये, नवीन संभाव्य किंमत ५४-५५ रुपये
  • म्हैस दूध: सध्याची किंमत ७५ रुपये, नवीन संभाव्य किंमत ७१-७२ रुपये
  • गाईचे दूध: सध्याची किंमत ५८ रुपये, नवीन संभाव्य किंमत ५७ रुपये
  • टी स्पेशल: सध्याची किंमत ६३ रुपये, नवीन संभाव्य किंमत ५९-६० रुपये

मदर डेअरी

  • फुल क्रीम: सध्याची किंमत ६९ रुपये, नवीन संभाव्य किंमत ६५-६६ रुपये
  • टोन्ड: सध्याची किंमत ५७ रुपये, नवीन संभाव्य किंमत ५५-५६ रुपये
  • म्हैस दूध: सध्याची किंमत ७४ रुपये, नवीन संभाव्य किंमत ७१ रुपये
  • गाईचे दूध: सध्याची किंमत ५९ रुपये, नवीन संभाव्य किंमत ५६-५७ रुपये
  • डबल टोन्ड: सध्याची किंमत ५१ रुपये, नवीन संभाव्य किंमत ४८-४९ रुपये
  • टोकन दूध : सध्याची किंमत ५४ रुपये, नवीन संभाव्य किंमत ५१-५२ रुपये

 

अमूल आणि मदर डेअरीने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, या बदलाचा संपूर्ण फायदा ग्राहकांना दिला जाईल असे म्हटले आहे. यामुळे दुधाची मागणी वाढेल आणि दुग्ध व्यवसायालाही नवी ऊर्जा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. हा निर्णय महागाईच्या काळात सामान्य जनतेसाठी, विशेषतः मध्यम आणि निम्न उत्पन्न गटासाठी एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

टॅग्स :दूधजीएसटीमुख्य जीएसटी कार्यालयकरमहागाई