GST On Daily Products: सणासुदीपूर्वी सामान्य माणसाला मोठा दिलासा देत, नवीन जीएसटी सुधारणांमुळे अनेक गोष्टींचे कर दर कमी झाले आहेत. हे दर २२ सप्टेंबरपासून लागू केले जातील. या जीएसटी सुधारणांचा फायदा प्रत्येक वर्गाला होईल, कारण दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते टीव्ही-एसी फ्रिजच्या किमती कमी होतील.
दररोज लोक दूध, ब्रेड, भाज्या इत्यादी खरेदी करतात. ऑफिसमधून घरी जाताना लोक अनेकदा दूध, ब्रेड, अंडी, सिगारेट आणि भाज्या यासारख्या वस्तू घेतात. नवीन जीएसटी सुधारणांअंतर्गत, त्यांच्या किमतीही कमी होतील. आम्ही तुम्हाला अशा १० गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या दररोज खरेदी केल्या जातात आणि ज्यांवर जीएसटी दर कमी झालाय.
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
दूध, चीज आणि डेअरी आयटम्सवर किती GST?
- दूध आणि भाज्यांवर पूर्वी जीएसटी दर लागू नव्हता आणि आताही लागू केलेला नाही. म्हणजेच त्याच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही.
- पनीरवरील जीएसटी दर १२% वरून ०% पर्यंत कमी करण्यात आला आहे. म्हणजेच जर तुम्ही २०० ग्रॅम पनीरचे पॅकेट ९० रुपयांना खरेदी केले तर तुम्हाला १० रुपये कमी द्यावे लागतील.
अंड्यावरही जीएसटी दर नाही.
लोणी आणि तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी १२% ते ५% च्या स्लॅबमध्ये ठेवण्यात आला आहे. आता २३० रुपयांना मिळणारं ५०० ग्रॅम बटर आता सुमारे २० रुपयांनी स्वस्त होईल.
बेकरी प्रोडक्ट किती स्वस्त?
- पिझ्झा आणि ब्रेडवरील जीएसटी ५% वरून शून्य श्रेणीत आणण्यात आला आहे. २० रुपयांचा ब्रेड १ रुपयांनी स्वस्त होईल.
- चॉकलेट, बिस्किटं आणि मिठाईंवरील जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. ५० रुपयांचं चॉकलेट आता ४४ रुपयांना खरेदी करता येईल.
- फळांचा रस आणि नारळाच्या पाण्यावरील कर १२% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आलाय.
इतर दैनंदिन वापराच्या वस्तू
- केसांचं तेल, शाम्पू, टूथपेस्ट, शेव्हिंग उत्पादने, टॅल्कम पावडर १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आली आहे. १०० रुपयांचे केसांचे तेल आता ८७ रुपयांना खरेदी करता येईल.
- टॉयलेट सोपवरील (बार/केक) जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
- टूथब्रश, डेंटल फ्लॉसवरील जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
- शेव्हिंग क्रीम/लोशन, आफ्टरशेव्हवरील जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
या वस्तू किती स्वस्त होतील?
- समजा तुम्ही दररोज १००० रुपयांच्या या वस्तू खरेदी करता, ज्यावर सरासरी जीएसटी दर १२% आहे आणि नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर, या सर्व वस्तूंवर सरासरी ५% जीएसटी लागू होईल, तर तुमच्या दैनंदिन खरेदीमध्ये सुमारे ८० रुपयांची कपात होईल.
- ८८० रुपयांच्या वस्तूंवर सरासरी १२% = १२० रुपये जीएसटी आकारला जात होता. म्हणजेच एकूण खरेदी १००० रुपये होती.
- आता ८८० रुपयांवर ५% जीएसटी = ४४ रुपये, म्हणजेच एकूण खरेदी ९२४ रुपये असेल.
- एकूण बचत = १२०-४४ = ७६ रुपये