Join us

पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:58 IST

Microsoft News: टेक जायंट मायक्रोसॉफ्ट २५ वर्षांनंतर पाकिस्तानमधील आपले कामकाज बंद करणार आहे. माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी हे देशाच्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

Microsoft News : जगातील सर्वात मोठी टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील आपले कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २००० साली मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमध्ये काम करायला सुरुवात केली होती. पाकिस्तानमध्ये मायक्रोसॉफ्टचे कधीही पूर्ण कॉर्पोरेट कार्यालय नव्हते, तरीही पाकिस्तानच्या उद्योग, शिक्षण आणि सरकारी क्षेत्रांमध्ये त्यांचं भरीव योगदान आहे.

पाकिस्तानमध्ये मायक्रोसॉफ्टचे काम काय होते?मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानच्या शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले होते. त्यांनी उच्च शिक्षण आयोग (HEC) आणि पंजाब ग्रुप ऑफ कॉलेजेस (PGC) यांसारख्या संस्थांसोबत भागीदारी केली होती. या भागीदारीतून मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे लोकांना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणाची सुविधा दिली जात होती. सरकारी क्षेत्रातही, मायक्रोसॉफ्टने २०० हून अधिक शिक्षण संस्थांना तंत्रज्ञानाचे उपाय पुरवले होते. याशिवाय, मायक्रोसॉफ्ट प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे आणि ऑनलाइन अभ्यासक्रम देण्यासारख्या उपक्रमांमध्येही सक्रिय होती.

कंपनीने हा मोठा निर्णय का घेतला?मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानचे माजी कंट्री मॅनेजर जवाद रहमान यांच्या मते, कंपनीचा हा निर्णय पूर्णपणे*व्यवसायाशी संबंधित आहे. २००७ पर्यंत कंपनीशी संबंधित असलेले जवाद म्हणतात की, मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तानच्या सध्याच्या अस्थिर आणि गुंतागुंतीच्या वातावरणात मोठ्या कंपन्यांना काम करणे खूप कठीण होत आहे.

माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंतापाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयाला पाकिस्तानच्या भविष्यासाठी चिंताजनक म्हटले आहे. त्यांनी दावा केला की, राजकीय पेच, आर्थिक अस्थिरता, वारंवार होणारे सरकार बदल, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, अस्थिर चलन आणि गुंतागुंतीची व्यापार धोरणे यामुळे कंपन्यांना पाकिस्तानमध्ये काम करणे अवघड झाले आहे.

येथे theregister.com नुसार, मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी पाकिस्तानमध्ये त्यांचे ऑपरेटिंग मॉडेल बदलत आहे. मात्र, या बदलाचा कंपनीच्या सेवा आणि ग्राहक करारांवर कोणताही परिणाम होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ, मायक्रोसॉफ्ट कदाचित आता स्थानिक कार्यालयांऐवजी भागीदार कंपन्यांद्वारे किंवा रिमोटली (दूरस्थपणे) आपले काम चालू ठेवेल.

वाचा - टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!

या निर्णयाचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल?मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक कंपनीने पाकिस्तानमधून आपले प्रत्यक्ष कामकाज काढून घेणे हा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा लागेल. डिजिटल साक्षरता आणि तंत्रज्ञान विकासाच्या योजनांवरही याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. 

टॅग्स :पाकिस्तानमायक्रोसॉफ्ट विंडोबिल गेटसअमेरिका