Join us

Microsoft मध्ये पुन्हा कर्मचारी कपात, 'या' विभागातील सर्वाधिक लोकांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:16 IST

Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टनं पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. मायक्रोसॉफ्टनं या वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं.

Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टनं पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. गीकवायरनं दिलेल्या वृत्तानुसार, या छंटणीचा फटका कंपनीच्या विविध विभागांमध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना बसला आहे. मात्र, सध्या तरी या कामावरून किती कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे, याबाबत कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मायक्रोसॉफ्टनं या वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं.

कोणाला सर्वाधिक फटका?

मायक्रोसॉफ्टनं ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय, त्यातील बहुतांश कर्मचारी प्रॉडक्ट आणि प्रोग्राम मॅनेजमेंटमध्ये काम करत होते. ३० जून रोजी संपलेल्या २०२४ च्या आर्थिक वर्षानंतर काही वेळातच ही कपात करण्यात आली आहे. एआय आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग सारख्या भविष्यातील वाढीच्या क्षेत्रात कामकाज सुरळीत करण्याच्या आणि गुंतवणूक करण्याच्या धोरणाचा हा एक भाग असल्याचं म्हटलं जातंय.

गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्टनं आपल्या अॅज्युर क्लाऊड युनिट आणि होलो लेन्स मिक्स्ड रिअॅलिटी टीमसह विविध विभागांमध्ये सुमारे १,००० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. मायक्रोसॉफ्टनं जानेवारी महिन्यात आपल्या गेमिंग विभागातील सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. ग्लोबल ले-ऑफ ट्रॅकिंग वेबसाइट लेऑप्सनुसार, यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान जगभरातील ३५० कंपन्यांनी सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.

"कंपनी आणि कर्मचारी स्तरावर समायोजन आवश्यक आहे आणि आमच्या व्यवसायाचं व्यवस्थापन करण्यासाठी नियमित प्रक्रिया आहे. आम्ही आमच्या चांगल्या भविष्यासाठी धोरणात्मक विकास क्षेत्रात गुंतवणूक करू आणि आमच्या ग्राहकांना, तसंच भागीदारांना पाठिंबा देत राहू," अशी प्रतिक्रिया मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यानं एका निवेदनाद्वारे म्हटलं.मायक्रोसॉफ्टचं आर्थिक वर्ष ३० जून रोजी संपलं असून रिस्ट्रक्चरिंगचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीने २०२३ मध्येही असंच केलं होतं.

टॅग्स :नोकरी