जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी आपली उर्वरित ९९ टक्के टेक प्रॉपर्टी गेट्स फाऊंडेशनला दान करण्याची घोषणा केली आहे, ज्याची किंमत अंदाजे १०७ अब्ज डॉलर आहे. ही देणगी आजवरच्या सर्वात मोठ्या परोपकारी कार्यांपैकी एक असेल. महागाईनुसार हिशोब केल्यास प्रसिद्ध उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर आणि अँड्र्यू कार्नेगी यांच्या ऐतिहासिक योगदानापेक्षा हे दान अधिक आहे. इतकंच नव्हे तर बर्कशायर हॅथवेचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे हे दान केलेल्या रकमेच्या बाबतीत गेट्स यांना मागे टाकू शकतात. बफे यांनी दान देण्याचं वचन दिलेल्या संपत्तीचं सध्याचं मूल्य फोर्ब्सनं १६० अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शेअर बाजारात चढ-उतार होत असताना ते मूल्य आणखी जास्त असू शकतं.
काळानुसार मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची ही देणगी गेट्स फाऊंडेशनला दिली जाणार आहे. यामुळे फाऊंडेशनला पुढील २० वर्षांत अतिरिक्त २०० अब्ज डॉलर्स खर्च करता येतील.
बिल अँड मलिंडा गेट्स फाऊंडेशन काय?
बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन ही जगातील सर्वात मोठी खाजगी धर्मादाय संस्था आहे, ज्याची स्थापना बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी २००० साली केली होती. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य सेवा सुधारणं आणि शिक्षणाला चालना देणं हे या फाउंडेशनचं मुख्य उद्दिष्ट आहे. गेट्स फाऊंडेशन भारतातही सक्रिय असून, देशभरातील ग्रामीण भागातील गरिबांचं जीवन सुधारण्यासाठी काम करत आहे. अशा तऱ्हेनं बिल गेट्स यांच्या देणगीचा काही भाग भारतातील गरीब जनतेलाही मिळणार आहे.