Join us
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : आरोप होताच सुहेल सेठ यांचा करार ‘टाटा सन्स’कडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:47 IST

लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू झालेल्या ‘मीटू’ मोहिमेमुळे टाटा सन्सने आपले सल्लागार सुहेल सेठ यांच्या कॉन्सुलेज या कंपनीशी असलेला करार मोडीत काढण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू झालेल्या ‘मीटू’ मोहिमेमुळे टाटा सन्सने आपले सल्लागार सुहेल सेठ यांच्या कॉन्सुलेज या कंपनीशी असलेला करार मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. हा करार ३0 नोव्हेंबरपासून संपुष्टात येईल.आतापर्यंत पाच महिलांनी सेठ यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप सोशल मीडियावरून केले आहेत. काहींनी सेठ यांनी जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा उल्लेख केला, तर एकीने अंतर्वस्त्रात त्यांनी हात घातल्याचे म्हटले आहे. आपण १७ वर्षांचे असताना सेठ यांना ट्विटरवर फॉलो करीत होतो. त्यांनी मात्र मला मद्यपानास निमंत्रण दिले व शरम वाटेल, असे मेसेजेस पाठवले, असे एकीने म्हटले.बिग बॉस-८ ची स्पर्धक डायंड्रा सोरेस हिने म्हटले होते, की एका पार्टीत निघत असताना, सेठ यांनी अनेक लोकांसमोरच बळेच चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इतर लोक हसत हसत पाहत होते. मी मात्र त्याचा प्रतिकार केला आणि त्यांच्या जिभेचा जोरात चावा घेतला. मी दिलेली ही शिक्षा त्यांना कायम लक्षात राहणारी होती.कैलाश खेर बादगायक कैलाश खेर याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप होताच राजस्थान सरकारने दिवाळीत होणाऱ्या म्युझिक इव्हेंटमधून त्याचे नाव बाद केले आहे. मीटू मोहिमेविषयी हेमामालिनी म्हणाल्या की, यात धक्कादायक काही नाही. महिलांना स्वत:चे रक्षण करावेच लागेल.

टॅग्स :मीटूटाटा