मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या नागरी सहकारी बँकांपैकी एक असलेल्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे विलीनीकरण करण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे. हे विलीनीकरण येत्या ४ ऑगस्टपासून लागू होणार आहे.
विलीनीकरणच्या योजनेस गेल्या महिन्यात २२ जुलैला झालेल्या सारस्वत बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत तसेच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर ही योजना आरबीआयकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, १९४९ च्या कलम ४४ अ (४) आणि कलम ५६ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत, आरबीआयने या विलीनीकरण योजनेला मंजुरी दिली आहे. विलीनीकरणानंतर न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्व मालमत्ता आणि जबाबदाऱ्या सारस्वत बँक ताब्यात घेणार आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व शाखा ४ ऑगस्टपासून सारस्वत बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत होतील. तसेच, सर्व ठेवीदार व ग्राहकांना सारस्वत बँकेचे ग्राहक मानण्यात येईल व त्यांच्या सर्व हक्क, व्यवहार आणि हितांची जबाबदारीही सारस्वत बँक स्वीकारणार आहे. हे विलीनीकरण सहकारी बँकिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, ग्राहकांसाठी सेवा क्षेत्र अधिक व्यापक आणि सशक्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वा.प्र)