Join us

अर्थमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक; शेअर बाजारात दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 04:02 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या विविध करसवलतींमुळे मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये जबरदस्त तेजी आली.

- प्रसाद गो. जोशीमुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या विविध करसवलतींमुळे मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये जबरदस्त तेजी आली. यामुळे बाजाराने पितृपक्षातच दिवाळी साजरी केली. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने एका दिवसामध्ये २२८४.५५ अंशांची विक्रमी वाढ नोंदविली आहे. आतापर्यंतच्या एकदिवसीय वाढीचा हा विक्रम आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)सुद्धा जोरदार वाढून १२ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. या उसळीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा ६.८९ लाख कोटींचा फायदा झाला.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सकाळी भारतीय उद्योगजगतासाठी विविध करसुधारणांची घोषणा केली. बाजाराने या सुधारणांचे जोरदार स्वागत केले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक १२१.४५ अंशांनी वाढीव पातळीवर (३६२१४.९२) खुला झाला. त्यानंतर तो ३८३७८.०२ अंशांपर्यंत वाढला. बाजाराच्या अखेरच्या सत्रामध्ये नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे तो काहीसा खाली येऊन ३८,०१४.६२ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो १९२१.१५ अंश म्हणजेच ५.३२ टक्के वाढला.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १०७४६.८० अंशांवर खुला झाला होता. नंतर तो ११३८१.९० अंशांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. पुढे काहीसा खाली येऊन ११२६१.०५ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ५५६.२५ अंश म्हणजे ५.२० टक्के वाढ झाली. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये बाजारात तेजीचा संचार असल्याने बाजारात दिवाळीचा उत्साह दिसून आला.

टॅग्स :निर्देशांक