लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्र सरकारने जीएसटी प्रणाली अधिक सोपी व सुटसुटीत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच १२ टक्के आणि २८ टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्यात येणार असून, त्याजागी फक्त एकच जीएसटी स्लॅब असेल. मात्र, तंबाखूसारख्या आरोग्यास हानिकारक वस्तूंवर ४० टक्के कर लादण्याची शिफारस करण्यात आली आहे. जीएसी स्लॅबमधील या नवीन बदलांमुळे खाद्यपदार्थ, औषधे आणि रोजच्या वापरातील वस्तूंवरील कर कमी होणार आहे. सध्या ५ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के स्लॅबमध्ये असलेल्या अनेक वस्तूंवरील कर नव्या जीएसटी प्रणालीमध्ये कमी होईल. यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः एसी, टीव्ही आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता आहे.
'गुड अँड सिम्पल टॅक्स' हवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये सुधारणांची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने म्हटले की, जीएसटी हा 'ग्रोथ सप्रेसिंग टॅक्स' (आर्थिक वाढ रोखणारा कर) झाला असून, तो पुन्हा 'गुड अँड सिम्पल टॅक्स' झाला पाहिजे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारला जीएसटी २.० वर लवकरच एक चर्चापत्र जाहीर करण्याची मागणी केली. यामुळे जीएसटी स्लॅबची संख्या कमी करणे, राज्यांचा महसूल सुरक्षित ठेवणे आणि छोट्या उद्योगांच्या समस्या सोडवण्यावर चर्चा होईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
१२% जीएसटीमधील वस्तू
जाम, फळांचे रस, फळे आणि भाज्यांचे रस, पॅकेटबंद नारळा पाणी, नमकीन, अनेक औषधे, वैद्यकीय व सर्जिकल वस्तू, ग्लुकोमीटर, कॉन्टॅक्ट लेन्स, चष्मे, लेन्स, वह्या, पेन्सिल्स, भूमितीय बॉक्स, स्प्रिंकलर्स, थ्रेशिंग मशीन, कंपोस्टिंग मशीन सायकल्स, ट्रायसिकल.
२८% जीएसटीमधील वस्तू
एसी, डिशवॉशर, ऑटोमोबाइल्स, सिमेंट, ठराविक प्रकारचे टीव्ही सेट.
जीवनावश्यक वस्तूंवरील कर होणार कमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, जीएसटी सुधारणांबाबत विविध राज्यांशी चर्चा झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होऊन त्या स्वस्त होतील, त्यामुळे हे बदल दिवाळीची भेट ठरतील. या सुधारणांमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) मोठा फायदा होईल.