Join us  

एअर इंडियात गुंतवणुकीसाठी अनेक उद्योगसमूह उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 2:26 AM

यूएईची एतिहाद एअरवेज, सिंगापूर एअरलाइन्स, हिंदुजा उद्योगसमूह एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपले प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेने आता आणखी वेग घेतला आहे. आता टाटा उद्योगसमूह, जर्मनीची विमान कंपनी लुफ्तांसा, यूएईची एतिहाद एअरवेज, सिंगापूर एअरलाइन्स, हिंदुजा उद्योगसमूह एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपले प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.एअर इंडिया विकत घेण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी पुढे यावे म्हणून केंद्र सरकारने काही पावले टाकली आहेत. एअर इंडियामध्ये सध्या ९४०० कर्मचारी आहेत. त्यांची संख्या कमी करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. एअर इंडियातील कर्मचारी संख्या कमी झाल्यासही गुंतवणूकदार आकर्षित होऊ शकतात, असे केंद्र सरकारला वाटते.कोरोना साथ तसेच प्रवासावर असलेली बंधने लक्षात घेता एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दाखविणारा प्रस्ताव संबंधित कंपनीने सादर करण्यास आता ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना साथ तसेच जगातील उद्योगधंदे, हवाई वाहतूक व्यवसायात सध्या तोटा होत असतानादेखील अनेक नामवंत कंपन्यांनी एअर इंडियामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी विचार चालविला आहे. भारत ही मोठी बाजारपेठ असून, कोरोना साथ ओसरल्यानंतर या देशात व्यवसायाच्या आणखी मोठ्या संधी उपलब्ध आहेत याची गुंतवणूकदार कंपन्यांना जाणीव आहे.>भारतीय कंपनीकडे राहणार नियंत्रणएअर इंडियामध्ये १०० टक्के गुंतवणूक करण्यास अनिवासी भारतीयांना केंद्राने परवानगी दिली आहे. मात्र एअर इंडियाची मालकी व नियंत्रण हे भारतात नोंदल्या गेलेल्या कंपनीकडेच असली पाहिजे. याचा अर्थ असा की परकीय गुंतवणूकदारांकडे एअर इंडियाचे ४९ टक्के समभाग असतील, मात्र त्यांना भारतातील कंपनीबरोबर भागीदारी करूनच एअर इंडियामध्ये गुंतवणूक करता येईल.

टॅग्स :एअर इंडिया