Major Choke Points: पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे सध्या 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Hormuz Strait) हे नाव चर्चेत आहे. इराणच्या दक्षिणेला असलेला हा पाण्याचा अरुंद मार्ग पर्शियन खाडीला ओमान आणि अरबी समुद्राशी जोडतो. संयुक्त राष्ट्रानं (UN) हा मार्ग बंद झाल्यास जगभरात मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली असून, यामुळे ऊर्जा, वाहतूक आणि अन्नधान्याच्या किमती वाढून राहणीमानाचा खर्च अधिक वाढण्याची शक्यता आहे. मात्र, होर्मुजसारखेच जगात इतरही अनेक मोक्याचे सागरी मार्ग आहेत, ज्यांना 'चोक पॉइंट्स' म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापार, विशेषतः तेल आणि वायू पुरवठ्यासाठी हे मार्ग अत्यंत महत्त्वाचे आहेत.
हार्मुजची सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का?
हार्मुजची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या स्ट्रॅटेजिक शिपिंग लेन्सपैकी एक आहे. जगातील तेल आणि वायू पुरवठ्याचा मोठा भाग या अरुंद मार्गावरून जातो. UNCTAD च्या २०२४ च्या आकडेवारीनुसार, दररोज सुमारे २ कोटी बॅरल तेल या मार्गाहून जातं, जे समुद्रातून होणाऱ्या एकूण जागतिक तेल व्यापाराच्या २५% आहे. यामध्ये दररोज १.४ कोटी बॅरल कच्चं तेल आणि सुमारे ६० लाख बॅरल पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश आहे. एकूण सागरी क्रूड व्यापारापैकी ३८%, एलपीजी व्यापारापैकी २९% आणि एलएनजी तसेच रिफाईंड तेल उत्पादनांपैकी प्रत्येकी १९% व्यापार याच मार्गावर अवलंबून आहे.
सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल; पाहा काय आहेत गोल्ड-सिल्व्हरचे लेटेस्ट दर
आशिया खंडाला ऊर्जा पुरवठ्याचा मोठा धोका
या मार्गावरील कोणत्याही अडथळ्याचा सर्वाधिक फटका आशियाला बसण्याची शक्यता आहे, कारण हा भाग ऊर्जेसाठी होर्मुजवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. २०२४ मध्ये या खाडीतून दररोज जाणाऱ्या १.४३ कोटी बॅरल कच्च्या तेलापैकी ८४% तेल आशियाई बाजारपेठेसाठी होतं, तर केवळ १६% युरोप आणि इतर भागांत गेलं. त्याचप्रमाणे, दररोज पाठवल्या जाणाऱ्या १०.४ अब्ज क्युबिक फूट लिक्विफाइड नॅचरल गॅसपैकी (LNG) सुमारे ८३% वाटा आशियाचा होता.
जगातील इतर महत्त्वाचे सागरी चोक पॉइंट्स
१. मलाक्काची सामुद्रधुनी (Strait of Malacca)
स्थान: इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दरम्यान.
महत्त्व: हा मार्ग हिंदी महासागराला प्रशांत महासागराशी जोडतो. भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरियाकडे जाणारा बहुतांश व्यापार येथूनच होतो. हा जगातील सर्वात व्यस्त व्यापारी मार्ग आहे.
२. बाब-अल-मंडेब (Bab-el-Mandeb)
स्थान: येमेन आणि जिबूती/इरिट्रिया दरम्यान.
महत्त्व: हा मार्ग रेड सी ला (Red Sea) एडनच्या खाडीशी आणि हिंदी महासागराशी जोडतो. सुएझ कालव्याकडे जाणाऱ्या सर्व जहाजांना येथून जावं लागतं.
३. सुएझ कालवा (Suez Canal)
स्थान: इजिप्तमध्ये.
महत्त्व: हा कालवा रेड सी आणि भूमध्य समुद्राला जोडतो. आशिया आणि युरोपमधील हा सर्वात छोटा मार्ग असून, याशिवाय जहाजांना संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून जावं लागेल.
४. पनामा कालवा (Panama Canal)
स्थान: मध्य अमेरिकेतील पनामा देशात.
महत्त्व: हा कालवा अटलांटिक महासागराला प्रशांत महासागराशी जोडतो. अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्ट्यांमधील व्यापारासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.
५. जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar)
स्थान: स्पेन आणि मोरोक्को दरम्यान.
महत्त्व: हा मार्ग अटलांटिक महासागराला भूमध्य सागराशी जोडतो. भूमध्य समुद्रात प्रवेश करण्याचा हा एकमेव नैसर्गिक मार्ग आहे.
६. बोस्फोरस आणि डार्डानेल्स (Bosphorus and Dardanelles)
स्थान: तुर्कस्तानात.
महत्त्व: हे मार्ग ब्लॅक सी ला (Black Sea) भूमध्य समुद्राशी जोडतात. रशिया आणि मध्य आशियाई देशांच्या तेल आणि धान्य निर्यातीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.
Web Summary : Hormuz Strait's importance for oil and gas highlighted amid tensions. Malacca, Bab-el-Mandeb, Suez, Panama, Gibraltar, Bosphorus straits are vital for global trade, energy.
Web Summary : तनाव के बीच तेल और गैस के लिए होर्मुज जलडमरूमध्य का महत्व। मलाक्का, बाब-अल-मंडेब, स्वेज, पनामा, जिब्राल्टर, बोस्फोरस जलडमरूमध्य वैश्विक व्यापार, ऊर्जा के लिए महत्वपूर्ण हैं।