Join us

महिंद्राची सर्व वाहने महागणार! SUV पासून पिकअपपर्यंतच्या किमतीत मोठी वाढ

By देवेश फडके | Updated: January 9, 2021 13:10 IST

महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही, पिकअप आणि ट्रक यांच्या किमतीत वाढ करण्यात आली असून, तात्काळ प्रभावापासून दरवाढ लागू होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. 

ठळक मुद्देमहिंद्रा कंपनीने केली सर्व प्रकारच्या वाहन किमतीत वाढतात्काळ प्रभावापासून वाढ लागू करण्यात येणारडिसेंबर २०२० मध्ये वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची केली होती घोषणा

नवी दिल्ली : भारतात वाहन निर्मितीत आघाडीवर असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने आपल्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही, पिकअप आणि ट्रक यांच्या किमतीत वाढ करण्यात आली असून, तात्काळ प्रभावापासून दरवाढ लागू होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. 

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने आपली प्रवासी आणि व्यवयासियक वाहनांच्या किमतीत १.९ टक्क्यांची मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत परिपत्रकात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. महिंद्रा कंपनीने केलेल्या दरवाढीनंतर प्रवासी आणि व्यवसायिक वाहनांच्या किमतीत ४ हजार ५०० ते ४० हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. मात्र, एसयूव्ही, पिकअप किंवा अन्य वाहनाच्या व्हेरिअंटवर ही वाढ अवलंबून असेल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. 

गेल्या काही महिन्यांपासून वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चात सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय वाहन निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. एकंदर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच कंपनीने जानेवारी २०२१ पासून सर्व प्रकारच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले. 

महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी (वाहन) विजय नाकरा यांनी सांगितले की, वाहन निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ होत असली, तरी आम्ही आमचे अन्य खर्चात कपात केली. मात्र, याचा समतोल राखताना खूपच कसरत करावी लागत आहे. म्हणूनच महिंद्राच्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती नाकरा यांनी दिली. ०८ जानेवारी २०२१ पासून बुकिंग करण्यात येणाऱ्या वाहनांना ही वाढ लागू असेल, असे सांगितले जात आहे.

गतवर्षीच्या डिसेंबर २०२० मध्येच महिंद्रा कंपनीकडून वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रकारची वाढ केली जात असते, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :महिंद्राकारवाहन उद्योग