Join us  

जीएसटी संकलनात देशात महाराष्ट्र अव्वल!, एक लाख ६८ हजार कोटींचे देशात झाले संकलन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 9:08 AM

महाराष्ट्राचा वाटा २७ हजार कोटींचा 

नवी दिल्ली : देशात जीएसटी (वस्तू व सेवा कर) संकलनाने एक लाख ६८ हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला असून, यामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनापोटी सरकारी खजिन्यात एक लाख ६८ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. या संकलनामधे महाराष्ट्राचे योगदान २७ हजार ४९५ कोटी रुपयांचे आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक (११,८२० कोटी) आणि त्यानंतर गुजरात (११,२६४ कोटी) यांचा क्रमांक आहे. सन २०२१ मध्ये महाराष्ट्रात २२,०१२ कोटी रुपयांचे संकलन झाले होते. त्या तुलनेत यंदा २५ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. मार्च, २०२२ या महिन्यांत एक लाख ४२ हजार कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. त्या तुलनेत एप्रिल महिन्यात संकलनाच्या रकमेत २५ हजार कोटी रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. सलग दहाव्यांदा जीएसटी संकलनाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेला लागलेले ग्रहण आता सुटण्याचे संकेत या वाढत्या आकडेवारीतून मिळत आहेत. दरम्यान, मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाद्वारे सरकारी खजिन्यात १५ लाख कोटी रुपयांच्या आसपास रक्कम जमा झाली होती, तर मार्च, २०२१ मध्ये संकलनाचा हाच आकडा १२ लाख कोटी रुपये इतका होता. 

प्रमुख राज्ये आणि कर संकलन१) महाराष्ट्र - २७,४९५ कोटी२) कर्नाटक - ११,८२० कोटी३) गुजरात -११,२६४ कोटी४) तामिळनाडू - ९,७२४ कोटी५) उत्तर प्रदेश - ८,५३४ कोटी

टॅग्स :जीएसटीमहाराष्ट्रगुजरात