मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर कंप्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा महागाईची झळ बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने या आठवड्यात सीएनजीच्या दरात १ रुपयाची वाढ केल्याने मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर प्रतिकिलो ७७ रुपयांवरून ७८ रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनधारकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
या दरवाढीचा परिणाम सीएनजी वापरणाऱ्या टॅक्सी, रिक्षा आणि बसमालकांवर होणार आहे. त्यांच्या वाहतूक शुल्कामध्ये वाढ होणार असल्याने त्याचा बोजा अप्रत्यक्षरीत्या सर्वसामान्य प्रवाशांवर पडणार आहे. येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.