लंडन : जेव्हा जेव्हा भारताला दाबण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा-तेव्हा भारत अधिक ताकदीने उभा राहिला आहे. तोच सिलसिला कायम ठेवत भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचं स्वप्न पूर्ण करेल, असा विश्वास मान्यवर अर्थतज्ज्ञ, उद्योगपती, धोरणकर्ते यांनी व्यक्त केला. लोकमत समूहाच्या वतीने ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’चे दुसरे पर्व लंडनमध्ये आज आयोजित करण्यात आलं आहे. या परिषदेत '५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्थाः भारतासाठी संधी आणि आव्हाने' या विषयावरील एका चर्चासत्र झालं. लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी या चर्चासत्रात मान्यवरांना बोलतं केलं. तेव्हा, वेगवेगळ्या क्षेत्रात भारत कसा प्रगतीपथावर वाटचाल करत आहे, हे अधोरेखित झालं.
भारताची क्षमता आणि आव्हानेया परिषदेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली, ज्यात अर्थशास्त्र, पायाभूत सुविधा, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा समावेश होता. ऋषी दर्डा यांनी अनेक मान्यवरांसोबत पॅनेल चर्चा केली. सध्या अमेरिका भारतावर टॅरिफ शुल्क लादत असताना, ५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतापुढे कोणती आव्हाने आहेत, यावर चर्चा झाली.
यावर बोलताना उद्योजक प्रकाश छाब्रिया यांनी पर्यटन क्षेत्राला मोठी संधी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, भारताकडे असलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा पाहता, जर पायाभूत सुविधा जसे की विमानतळे, हॉटेल्स आणि हायवे मजबूत झाले तर पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याचा फायदा इतर क्षेत्रांनाही होईल.
विशाल चोरडिया, संचालक - प्रविण मसालेवाले यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भर दिला. ते म्हणाले की, भारताची खरी वाढ ग्रामीण भागात आहे आणि या क्षेत्राकडे अजूनही खूप संधी आहेत. तसेच, शिक्षणव्यवस्थेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करताना ते म्हणाले की, महाराष्ट्राकडे शिक्षण आणि विद्यापीठांचे मोठे जाळे असल्याने ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्र नक्कीच नेतृत्व करेल.
ट्रम्प यांचा दुटप्पीपणा आणि भारताची ताकदराज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अमेरिकेच्या धोरणांवर भाष्य केले. ते म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांना सतत टॅरिफ लादण्याच्या घोषणेतून चर्चेत राहायचे आहे. पण भारताचा इतिहास असा आहे की, त्याला जेवढे दडपण्याचा प्रयत्न कराल, तेवढ्याच ताकदीने तो उभा राहतो. देशाच्या विकासासाठी काही लोकांचा विकास पुरेसा नाही, त्यासाठी देशातील १४० कोटी लोकांची भूमिका महत्त्वाची असेल.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, मोदींसारखे दूरदृष्टीचे नेतृत्व मिळाल्याने भारताचे ५ ट्रिलियनचे स्वप्न नक्कीच साकार होईल. भारताकडे असलेली साधनसंपत्ती, कौशल्य-आधारित मनुष्यबळ आणि स्वस्त कामगार ही आपली खरी ताकद आहे, असे त्यांनी सांगितले.
अमृता फडणवीस यांनी थेट आकडेवारी सादर करत भारताची जगात रँकींग कशी सुधारली याची माहिती दिली. याशिवाय अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. शिवाय येत्या काळात महिला अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला.
वाचा - गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
ही परिषद केवळ एक चर्चासत्र नव्हती, तर जागतिक पटलावर भारताची आर्थिक धोरणे आणि क्षमता मांडण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली. या विचारमंथनातून धोरणनिर्मितीला अधिक व्यवहार्य दिशा मिळेल आणि त्याचा फायदा देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली.