Join us  

निवडणुकांच्या धामधुमीत वाढत्या महागाईचे चटके; कांदे-बटाटे महाग, घाऊक महागाई दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 9:25 AM

भाज्या, कांदे, बटाटे व कच्च्या खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा दर किंचित वर सरकला आहे. 

देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच मार्चमध्ये घाऊक महागाईचा दर अल्प प्रमाणात वाढून ०.५३ टक्के झाला. फेब्रुवारीत तो ०.२० टक्के होता. भाज्या, कांदे, बटाटे व कच्च्या खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा दर किंचित वर सरकला आहे.  

घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा (डब्ल्यूपीआय) दर एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत सातत्याने शून्याच्या खाली होता. नोव्हेंबरमध्ये तो ०.२६ टक्के होता. त्याआधी डिसेंबर २०२२ मध्ये तो ५.०२ टक्के होता. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महागाईतील वाढीस प्रामुख्याने कांदे व बटाटे यांच्या किमतीतील वाढ कारणीभूत आहे. कांद्याच्या महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये २९.२२ टक्के होता. मार्चमध्ये तो वाढून ५६.९९ टक्के झाला. आगामी खरिपातील कांदे काढायला येईपर्यंत कांद्याच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण होण्याचा धोका आहे.  

किरकोळ क्षेत्रातील महागाईत घट  

  • खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्यामुळे मार्चमध्ये किरकोळ क्षेत्रातील महागाई घटून ४.८५ टक्क्यांवर आली. हा महागाईचा ५ महिन्यांचा नीचांक आहे.
  • बटाट्यांच्या घाऊक महागाईचा दर मार्चमध्ये वाढून ५२.९६% झाला. फेब्रुवारीत ही वाढ १५.३४% होती. 
  • गेल्या वर्षी मार्चमध्ये कांद्याच्या दरात ३६.८३% तर बटाट्याच्या दरात २५.५९% घसरण झाली होती. 
  • जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोलियम क्षेत्रातील महागाईचा दर मार्चमध्ये १०.२६ टक्के राहिला.
टॅग्स :बटाटाकांदामहागाईसरकार