Join us

LIC ची वेबसाईट पाहून तामिळनाडूचे CM एमके स्टॅलिन भडकले; एक्सवर पोस्ट करत म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 12:34 IST

LIC Website Language Row : एलआयसीची वेबसाईट पाहून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन नाराज झाले आहे. त्यांनी एक्स पोस्टवरुन यावर प्रतिक्रिया दिली आहे.

LIC Website Language Row : दक्षिणेतील राज्य आपल्या स्थानिक अस्मितांबाबत प्रचंड जागरुक आहेत. आपली भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. याचेच एक ताजे उदाहरण समोर आलं आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) वेबसाइटची डीफॉल्ट भाषा हिंदी असल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर एलआयसीने प्रतिक्रिया दिली आहे. तांत्रिक समस्येमुळे फक्त हिंदी भाषा दिसत होती. यावर तोडगा निघाला असून आता तुम्ही इंग्रजी आणि मराठीतही वेबसाइट पाहू शकता. वास्तविक, एलआयसीची वेबसाईट फक्त हिंदीत दिसत असल्याने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन भडकले. केंद्र सरकार जबरदस्तीने लोकांवर हिंदी लादत असल्याचा आरोप त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. त्यांना याला भाषिक अत्याचारही म्हटले. दुसरीकडे स्टॅलिन यांचा आरोप अनेकांना आवडला नसून त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वास्तविक, काही काळ एलआयसी वेबसाइटचे होमपेज हिंदीमध्ये दिसत होते. तिथे इंग्रजीचा पर्याय उपलब्ध नव्हता. हा मुद्दा बनवून एमके स्टॅलिन यांनी लिहिले, “एलआयसीची वेबसाइट हिंदी लादण्यासाठी एक प्रचार साधन बनवण्यात आली आहे. इंग्रजी निवडण्याचा पर्यायही हिंदीत दिसत आहे! हे भारतातील विविधतेला पायदळी तुडवणारे असून सांस्कृतिक आणि भाषिक अत्याचार लादण्याचा प्रकार आहे. एलआयसीने सर्व भारतीयांच्या आश्रयाने विकास केला आहे. त्याच्या बहुसंख्य योगदानकर्त्यांचा विश्वासघात करण्याची हिम्मत कशी होते? हा भाषिक अत्याचार त्वरित मागे घेण्याची आमची मागणी आहे. #StopHindiImpposition."

स्टॅलिनच्या आवाजात अण्णाद्रमुक आणि काँग्रेसही सामीलएआयएडीएमके आणि काँग्रेस या मुद्द्यावर एमके स्टॅलिन यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. AIADMK नेते पलानीस्वामी म्हणाले की, केंद्र सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी केरळ काँग्रेसने X वर पोस्ट शेअर करताना एलआयसीच्या या निर्णयावर टीका केली. काँग्रेसने म्हटले आहे की, इंग्रजी ही डिफॉल्ट भाषा असलेल्या जुन्या वेबसाइटमध्ये काय कमी होती?

लोकांनी उडवली स्टॅलिन यांची खिल्ली नेते मंडळी या प्रकरणाला भाषिक अत्याचार म्हणत असले तरी सामान्य जनता याकडे केवळ तांत्रिक दोष म्हणून पाहत आहे. स्टॅलिन यांच्या पोस्टवर टिका करताना, किशोर अय्यर नावाच्या वापरकर्त्याने लिहिले, “सर, यापेक्षाही मोठे मुद्दे आहेत – कालाकुरीची, वांगीवियाल, सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला भोसकणे आणि तामिळनाडूमध्ये वाढत्या अंमली पदार्थांचे व्यसन. कृपया त्यांच्याकडे लक्ष द्या.”

दुसऱ्या युजरने लिहिले, “सर, एलआयसीने सांगितले की ही तांत्रिक चूक होती. "आम्ही आता आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मोठ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू शकतो का?" कौटिल्य उवाच नावाच्या युजरने लिहिले की, “मुख्यमंत्र्यांकडे कोणतंही चांगलं काम राहिलं नसल्याचं दिसत आहे.” तेजस नावाच्या युजरने लिहिले की, साइट एका क्लिकवर भाषा इंग्रजीमध्ये बदलत आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान गोंधळात टाकणारे आहे.... 

टॅग्स :एलआयसीतामिळनाडूतामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल २०२४