LGEC 2025: आपण छोटा विचार अजिबात करू नका. आपल्याला जगाशी लढायचं आहे. कुणालाच भारताला पुढे जाऊ द्यायचं नाहीए. त्यांना भारताला केवळ बाजारपेठ बनवून ठेवायचं आहे. मात्र, भारतामध्ये प्रचंड क्षमता आणि संधी आहेत, त्या ओळखल्या पाहिजेत, असा मोलाचा सल्ला दिग्गज उद्योजक आणि वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी तरुणांना, उद्योजकांना दिला. कोणीही काहीही म्हटलं तरी मी माझा भारतीय बाणा सोडला नाही, भारताच्या नावावरच सर्व काम केलंय. मी ३० वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहे. परंतु माझा दिवसरात्र भारतात संपर्क असतो, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'लोकमत ग्लोबल इकॉनोमिक कन्व्हेन्शन'मध्ये अनिल अग्रवाल यांना 'भारत भूषण' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, त्यानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
"आज भारताला अन्य कोणी पुढे जाऊ देत नाहीए. त्यांना भारताला केवळ एक मार्केट बनवून ठेवायचं आहे. सर्व सामान भारतात जावं, तिकडे उत्पादन कमी व्हावं, असं त्यांना वाटतं, याकडे लक्ष वेधत अनिल अग्रवाल म्हणाले की, बाहेरच्या अनेक कंपन्या आज भारतीय चालवत आहेत. जगातील अशी कोणतीही संसद नसेल जिकडे भारतीय काम करत नसतील. त्यांच्याकडून सल्ले घेतले जातात आणि आपली स्ट्रॅटजी काय असेल हेही त्यांनाच विचारलं जातं. हे आपल्या भारतीयांच्या डीएनएमध्ये आहे. भारतीय महिलांनाही आज अनेक संधी मिळत आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी त्या मोलाचं काम करत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. तुम्ही कधीही लहान विचार करू नका. आता आपल्याला जगाशी लढायचंय. भारत हाच असा एक देश आहे जिकडे १४० कोटी लोक आहेत आणि ६५ टक्के लोक मध्यमवर्गाच्याही खाली आहेत, ते आता मध्यमवर्गीय बनत आहेत. येत्या काळात भारताची मागणी आणखी वाढणार आहे. या सर्वात महाराष्ट्रच सर्वश्रेष्ठ आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
"महाराष्ट्र म्हणजे महान असं राष्ट्र"
"महाराष्ट्र या नावातून ते एक महान राष्ट्र आहे हेच दिसून येतं. आज संपूर्ण जगात अशी कोणतीही जागा नाही जिकडे समुद्र आहे, डोंगर आहेत, काम करणारेही अनेक लोक आहे, अनेक प्रकारची खनिजं महाराष्ट्रात सापडतात, तिकडे अनेक प्रकारची शेती होती, या सर्वांना काही तोड नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात एक वेगळीच प्रतिभा आहे," असं ते म्हणाले.