Join us

पेट्रोलपेक्षा महाग झाले लिंबू! उन्हाळा येताच तोंडचं पाणी पळालं; तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 16:36 IST

गुजरातमधील राजकोटमध्ये लिंबाचा दर २०० रुपये किलोवर पोहोचला आहे. याआधी लिंबू ५० ते ६० किलो दरानं मिळत होता. 

राजकोट-

उन्हाळा येताच लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत. उन्हाळ्यात लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा परिस्थितीत वाढती मागणी, पण पुरवठा मंदावल्यानं लिंबाच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये लिंबाचा दर तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचला आहे. याआधी लिंबू ५० ते ६० किलो दरानं मिळता होता. "लिंबाची किंमत 200 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. याआधी लिंबू ५० ते ६० रुपये प्रतिकिलोच्या दरात मिळत होता. प्रत्येक गोष्टीत दरवाढीमुळे आमचं 'किचन बजेट' गडबडलं आहे. भाव कधी खाली येतील माहीत नाही", अशी एका ग्राहकानं एएनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली.

उन्हाळ्यातील उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा वापर अनेक प्रकारे केला जातो. लिंबू, व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत असून उन्हाळ्यात आपल्याला हायड्रेट ठेवतो तसेच आपली पचनसंस्था सुरळीत राखण्यात मदत होते. पण, लिंबाची मागणी ज्या प्रमाणात वाढली आहे, तेवढा पुरवठा वाढलेला नाही. "जवळपास प्रत्येक भाज्यांचे भाव वाढले आहेत, परंतु ते अपेक्षेपेक्षा जास्त आहेत. एवढी महागडी भाजी घेणं मध्यमवर्गीय ग्राहकाला अवघड आहे. जसं आपण लिंबू मोठ्या प्रमाणात खरेदी करायचो, तसं आपण ते विकत घेऊ शकत नाही. गेल्या वर्षी मार्चमध्ये आम्ही जी किंमत देत होतो त्यापेक्षा ही किंमत जवळजवळ दुप्पट आहे, एप्रिल-मे मध्ये काय होईल हे मला माहित नाही", असं हिमांशू नावाच्या एका ग्राहकानं सांगितलं.

पीनल पटेल नावाच्या आणखी एका ग्राहकानं सांगितलं की, "याआधी आम्ही दर आठवड्याला १ किलो लिंबू खरेदी करायचो, परंतु आता किंमत वाढल्यामुळे आम्ही २५० किंवा ५०० लिंबू खरेदी करत आहोत. आमच्या खर्चावर परिणाम झाला आहे. या किमती वाढल्यानं व्यापाऱ्यांनाही फटका बसत आहे कारण अचानक भाव वाढल्यानं ग्राहक कमी माल खरेदी करत आहेत.

टॅग्स :व्यवसाय