Piyush Goyal On Startup Ecosystem: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. नवी दिल्ली येथे आयोजित स्टार्टअप महाकुंभात बोलताना गोयल यांनी भारतीय स्टार्टअप्स फूड डिलिव्हरी आणि ई-कॉमर्ससारख्या सेवांपुरते मर्यादित आहेत, तर चीन बॅटरी तंत्रज्ञान, एआय आणि सेमीकंडक्टर डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक करत असल्याचं म्हटलं. भारतातील स्टार्टअप्स भविष्यासाठी काम करत आहेत की केवळ तात्काळ सुविधा पुरवत आहेत, हे पाहावे लागेल, असंही ते म्हणाले पीयूष गोयल यांनी भारतीय स्टार्टअपबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारतपेचे माजी सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर, झॅप्टोचे सहसंस्थापक आदित पलिचा आणि इन्फोसिसचे माजी एक्झिक्युटिव्ह मोहनदास पै नाराज झाले आहेत.
अश्नीर ग्रोव्हर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. "भारतात फक्त राजकारण्यांनाच 'रिअॅलिटी चेक'ची गरज आहे. बाकी सर्व जण भारताच्या वास्तवात जगत आहेत," असं ते म्हणाले. चीननंही फूड डिलिव्हरीपासून सुरुवात केली. त्यानंतरच त्यांनी डीप-टेकमध्ये पाऊल ठेवलं. राजकारण्यांनी आजच्या रोजगार निर्मात्यांना फटकारण्यापूर्वी २० वर्षांपर्यंत १० टक्क्यांपेक्षा अधिक आर्थिक विकास दर राखण्याचे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
पीयूष गोयल यांच्या विधानावरून वाद; Zepto सीईओ नाराज, स्टार्टअप्सवरून सुनावलं
इन्फोसिसचे माजी एक्झिक्युटिव्ह आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट मोहनदास पै यांनीही केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याऐवजी सरकार त्यांच्यावर एंजल टॅक्स आणि इतर धोरणांद्वारे दबाव टाकत आहे, असा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले आदित पलिचा?
झेप्टोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित पलिचा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. "भारतात कन्झुमर इंटरनेट स्टार्टअपवर टीका करणं सोपं आहे. जेव्हा आपण त्यांची तुलना चीन आणि अमेरिकेच्या नेत्रदीपक तांत्रिक प्रगतीशी करता तेव्हा हे सर्व घडतं. आपलंच उदाहरण घ्यायचं झाले तर आम्ही झेप्टोच्या माध्यमातून दीड लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे एका कंपनीनं केलंय जी ३.५ वर्षांपूर्वी अस्तित्वातही नव्हती. आम्ही दरवर्षी एक हजार कोटी रुपयांचा कर भरतो. अब्जावधी डॉलर्सचा एफडीआय भारतात आला असून सप्लाय चेन मजबूत करण्यासाठी सातत्यानं गुंतवणूक केली जात आहे. भारताच्या इनोव्हेशनच्या जगतात हे एखाद्या जादू प्रमाणे नाही तर काय?" असं आदित पलिचा म्हणाले.
काय म्हणालेले गोयल?
"आपण केवळ त्वरित नफा मिळवून देणाऱ्या कंपन्या सुरू करत आहोत हे पाहून दु:ख होतंय. दुसरीकडे चीन दीर्घकालीन इनोव्हेशनमध्ये पुढे जात आहे. भारतीय स्टार्टअप्स फूड डिलिव्हरी आणि ई कॉमर्ससारख्या सेवांपर्यंतच मर्यादित राहिलेत तर, चीन बॅटरी टेक्नॉलॉजी, एआय आणि सेमीकंडक्टर विकासात गुंतवणूक करत आहे," असं गोयल म्हणाले.