Join us

अर्थव्यवस्थेची कोविडपूर्व स्थितीकडे वाटचाल, कुमारमंगलम बिर्ला यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 06:14 IST

Kumar Mangalam Birla : आदित्य बिर्ला समूहातील कंपनी अल्ट्राटेक सिमेंटच्या सर्वसाधारण सभेस आभासी पद्धतीने संबोधित करताना बिर्ला यांनी सांगितले की, लसीकरणाला आता वेग आला आहे. त्यामुळे भारताची तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढेल.

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने सामान्य स्थितीत परतत असून, नवीन विषाणू व तिसऱ्या लाटेबाबत अनिश्चितता असतानाही अर्थव्यवस्था वेगाने कोविडपूर्व स्थितीकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती तथा आदित्य बिर्ला समूहाचे चेअरमन कुमारमंगलम बिर्ला यांनी केले आहे. 

आदित्य बिर्ला समूहातील कंपनी अल्ट्राटेक सिमेंटच्या सर्वसाधारण सभेस आभासी पद्धतीने संबोधित करताना बिर्ला यांनी सांगितले की, लसीकरणाला आता वेग आला आहे. त्यामुळे भारताची तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढेल. याशिवाय साथीच्या परिणामातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकार यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. याचा सुपरिणाम दिसून येत असून, अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असल्याचे संकेत मिळत आहे.

वित्त वर्ष २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १० टक्क्यांनी वृद्धी पावेल, असा अंदाज आहे. सरकारने घोषित केलेल्या नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्पामुळे येणाऱ्या वर्षांत सरकारी भांडवली खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अल्ट्राटेकसारख्या कंपन्यांच्या नेतृत्वाखाली खासगी क्षेत्रातील भांडवली खर्चही वाढण्याची शक्यता आहे. 

सर्वच देश करीत आहेत पायाभूत खर्चात वाढ- जागतिक अर्थव्यवस्थांबाबत बिर्ला यांनी सांगितले की, अनेक देश पतधोरण हळूहळू सामान्य करण्याचा विचार करीत आहेत. या कृतींना उपायांचीही जोड असेल. त्यासाठी पायाभूत खर्चात वाढ केली जात आहे. - अमेरिका सरकार पायाभूत खर्चात मोठी वाढ करीत आहे. बहुतांश अर्थव्यवस्थांत हरित गुंतवणुकीस गती दिली जात आहे.

टॅग्स :कुमार मंगलम बिर्लाव्यवसाय