Join us  

Kotak Bank Share Crash: 'कोटक'वर RBI ची कारवाई, गुंतवणूकदारांकडून धडाधड शेअरची विक्री; स्टॉक जोरदार आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 3:44 PM

Kotak Bank Share Crash: कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन व मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नवीन ग्राहक जोडण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) बुधवारी बंदी घातली. यानंतर बँकेच्या शेअर्सवर परिणाम दिसून आला.

Kotak Bank Share Crash: कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन व मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नवीन ग्राहक जोडण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) बुधवारी बंदी घातली. बँकेला क्रेडिट कार्ड जारी करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा परिणाम बँकेच्या शेअर्सवर झाला. गुरुवारी कामकाजादरम्यान, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण दिसून आली. 

गुरुवारी कामकाजादरम्यान कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. कामकाजाच्या अखेरिस कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये १०.७३ टक्क्यांची घसरण होऊन ते १६४५ रुपयांवर आले. 

काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं? 

आयटीविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कोटक महिंद्रा बँकेवर ही कारवाई करण्यात आली असून, बंदी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. 'कोटक महिंद्रा बँकेचे आयटी जोखीम व्यवस्थापन आणि माहिती सुरक्षा संचालन यात ‘गंभीर उणिवा’ आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये बँकेच्या माहिती तंत्रज्ञान तपासात गंभीर त्रुटी समोर आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यात बँक सातत्यानं अपयशी ठरली. त्यामुळे हे पाऊल रिझर्व्ह बँकेला उचलावे लागले,' असं रिझर्व्ह बँकेनं निवेदनात म्हटलंय. 

बँकेला सध्याचे ग्राहक आणि क्रेडिट कार्डधारकांना नेहमीप्रमाणे सर्व सुविधा देता येतील. आरबीआयच्या पूर्वपरवानगीने सुरु केलेल्या व्यापक बाह्य ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँकेवरील या निर्बंधांची समीक्षा करण्यात येणार आहे. 

टॅग्स :बँकशेअर बाजार