Join us  

कोचर यांची अटक अवैध, कोर्टाकडून जामीन कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 5:15 AM

कोचर दाम्पत्याचा मंजूर केलेला अंतरिम जामीन मंगळवारी कायम केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना केलेली अटक बेकायदा असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. न्या. अनुजा प्रभुदेसाई व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने सीबीआयला झटका देत कोचर दाम्पत्याचा मंजूर केलेला अंतरिम जामीन मंगळवारी कायम केला.

चंदा आणि दीपक कोचर यांना २४ डिसेंबर २०२२ रोजी सीबीआयने व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या ३,२५० कोटींच्या कर्जामध्ये फसवणूक आणि अनियमितता केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. कोचर बँकेचा कारभार सांभाळत असताना व्हिडिओकाॅन समूहाला कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यामोबदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू रिन्युअबलमध्ये व्हिडिओकॉनने आर्थिक गुंतवणूक केली. त्यानंतर व्हिडिओकाॅनला दिलेले कर्जाचे एनपीएमध्ये रूपांतर झाले आणि बॅँकेची फसवणूक झाली. अटक केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने चंदा व दीपक कोचर यांना २९ डिसेंबर २०२२ पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. गेल्यावर्षी ९ जानेवारी रोजी न्यायालयाने दोघांचाही अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला.

टॅग्स :व्यवसायगुन्हेगारीन्यायालय