Join us  

प्रत्येक व्यक्तीजवळ किती सोने ठेवण्याची परवानगी? कुणाकडे किती सोने असावे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 3:24 PM

सरकारी यंत्रणांकडून विविध ठिकाणी झालेल्या छापेमारीत कित्येक किलो सोने जप्त झाल्याचे कानावर पडत असते. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, एका व्यक्तीला वा कुटुंबाला घरात नेमके किती सोने ठेवण्याची मुभा आहे. 

नवी दिल्ली : पुरातन काळापासून भारतीयांमध्ये सोन्याबाबत कमालीचे आकर्षण आहे. सध्या गोल्ड इटीएफ, सॉव्हरिन गोल्ड बाँड आदी सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणुकीचे अनेक पर्यायही असले तरीही देशात खऱ्याखुऱ्या सोन्याचे आकर्षण कायम आहे. सरकारी यंत्रणांकडून विविध ठिकाणी झालेल्या छापेमारीत कित्येक किलो सोने जप्त झाल्याचे कानावर पडत असते. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, एका व्यक्तीला वा कुटुंबाला घरात नेमके किती सोने ठेवण्याची मुभा आहे. 

‘सीबीडीडी’चे निर्देश काय आहेत? घरात ठेवणे चुकीचे आहे, असा संदेश जाऊ नये तसेच प्रत्येकाने बाळगलेल्या सोन्याबाबत इतरांकडून संशय निर्माण केला जाऊ नये, यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) १९९४ मध्ये काही निर्देश जारी केले आहेत. 

मुख्यत: या मार्गदर्शक सूचना आयकर अधिकाऱ्यांसाठी आहेत. यातून प्रत्येक व्यक्तीला तसेच कुटुंबातील सदस्यांना जवळ किती सोने बाळगता येतील, याबाबत सूचना दिल्या आहेत. दिलेल्या मर्यादेच्या आत सोने असेल तर ते जप्त केले जाणार नाही, असा याचा अर्थ होतो. 

याबाबत ठोस कायदा नाहीच -भारतात याआधी सोने नियंत्रण कायदा १९६८ लागू होता. यात एका मर्यादेपेक्षा अधिक सोने बाळगण्यास परवानगी दिली जात नसे. हा कायदा जून १९९० मध्ये रद्द झाला. यानंतर व्यक्ती किंवा कुटुंबाने किती सोने बाळगावे, याची मर्यादा निश्चित करणारा कायदा लागू केलेला नाही.

जप्तीदरम्यान हस्तगत सोन्यापैकी किती सोने प्रक्रियेबाहेर ठेवावे लागेल, या हेतूने सरकारने हे निर्देश जारी केले आहेत. व्यक्ती वा कुटुंबाने जवळ किती सोने बाळगावे, याची नेमकी कायदेशीर मर्यादा यात दिलेली नाही.

कुणाकडे किती सोने असावे?- विवाहित महिलेला स्वत:जवळ ५०० ग्रॅमपर्यंत सोने, दागिने बाळगता येतात. - अविवाहित महिलेला २५० ग्रॅमपर्यंत सोने बाळगता येईल.- कोणत्याही विवाहित किंवा अविवाहित पुरुषाजवळील १०० ग्रॅमपर्यंत सोने जप्त करता येणार नाही. - ही मर्यादा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनुसार आहे. परिवारात दोन विवाहित महिला असल्यास त्यांना १ किलो दागिने घरात ठेवता येतील.  

टॅग्स :सोनंव्यवसाय